तब्बल सहा धावत्या ऑटोरिक्षांचे आरटीओने केले कटरने दोन तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:38 AM2022-12-26T10:38:32+5:302022-12-26T16:45:35+5:30
पाच रिक्षा तेलंगणातील : गडचांदूर मार्गावर स्क्रॅप रिक्षा
चंद्रपूर : विना चेसिस क्रमांक रस्त्यावर धावणाऱ्या सहा ऑटोरिक्षांचे आरटीओंनी थेट गॅस कटरच्या साहाय्याने दोन तुकडे करुन भंगार रिक्षाचालकांच्या स्वाधीन केले. ही कारवाई गडचांदूर कोरपना मार्गावर करण्यात आली. या कारवाईने विना चेसिस रस्त्यावर धावणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. यातील पाच रिक्षा तेलंगणातील तर एक रिक्षा यवतमाळमधील आहे. ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २० डिसेंबरला आरटीओचे पथक गडचांदूर-कोरपना मार्गावर वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, या मार्गावर अनेक ऑटोरिक्षा धावताना आरटीओच्या पथकाच्या नजरेस पडले. यावेळी आरटीओ पथकाने एपी शून्य एक एक्स २४१५, एपी शून्य एक एक्स ४१६९, एपी शून्य एक एक्स ८९८८, एपी शून्य एक व्ही ९३१७, एपी शून्य एक एक्स ११४६ या तेलंगणातील पाच तर महाराष्ट्र यवतमाळ येथील एमएच २९ एम ६१८० ऑटोरिक्षाला थांबवून कागदपत्राची तपासणी केली.
यावेळी यवतमाळ येथील एमएच २९ एम ६१८० या ऑटोरिक्षावर कोणत्याही प्रकारचा चेसिस नंबर आढळून आला नाही. तसेच सहाही रिक्षाचालकांकडे कोणत्याही प्रकारचे वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे हे सर्व रिक्षा परमिट उतरवलेले किंवा स्क्रॅप केलेले असावे असे दिसून आले. त्यामुळे रिक्षामालक व त्याच्या ताबेदार यांच्या संमतीने सर्व रिक्षा कोरपना येथील निखिल इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये नेऊन गॅस कटरच्या साह्याने कापण्यात आले. प्रत्येक ऑटोरिक्षाचे दोन तुकडे करण्यात आले. दरम्यान, उरलेला भंगार रिक्षावाल्यांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या नेतृत्वात मोटार वाहन निरीक्षक कलबीर कलसी, मोटार वाहन निरीक्षक सुनील पायघन व आरटीओच्या पथकाने केली. या कारवाईमुळे कागदपत्रे नसणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.
ऑटोरिक्षा चालकांमध्ये आनंद
गडचांदूर-कोरपना मार्गावर मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षा धावतात. येथे काही ऑटोरिक्षा विना चेसिस नंबर असताना तसेच वैध कागदपत्रे नसताना धावत होते. त्यामुळे प्रामाणिक व वाहतूक नियमांचे पालन करुन धावणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांना प्रवासी मिळत नव्हते; परंतु आरटीओने विना चेसिस नंबर असलेल्या व कागदपत्रे नसणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई केल्याने प्रामाणिक ऑटोरिक्षा चालकांमध्ये आनंद पसरला आहे.
जिल्ह्यातील पहिलीच कारवाई
विना चेसिस नंबर, वैध कागदपत्रे नसणे, वाहनाचे परमिट नसणे, स्क्रॅप झालेले वाहन आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन रस्त्यावर धावताना दिसले तरी त्यावर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे बघायला मिळायचे; मात्र आता थेट वाहन स्क्रॅप करुन त्याचे दोन तुकडे केल्याची कारवाई ही आतापर्यंतची जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
गडचांदूर कोरपना मार्गावर ऑटोरिक्षाची तपासणी केली असता, सहा रिक्षाचालकांकडे कोणत्याही प्रकारचे वैध कागदपत्र नव्हते. परमिट उतरवलेले परराज्यातील पाच तर परजिल्ह्यातील एक स्क्रॅप वाहनाद्वारे व्यवसाय करताना आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सर्व ऑटोरिक्षा चालकांनी नियमांचे पालन करुनच वाहन चालवावे, स्क्रॅप वाहने चालवू नये, अन्यथा त्यांच्यावरसुद्धा अशीच कारवाई करण्यात येईल.
- किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर