दीपालीच्या आरोपींवर कारवाई, आशाच्या पदरी निराशा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 05:00 AM2021-04-04T05:00:00+5:302021-04-04T05:00:44+5:30
राजुरा तालुक्यातील साखरी येथील तुळशीराम घटे हल्ली मुक्काम सास्ती ता. राजुरा यांची शेतजमीन वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत करण्यात आली. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे तुळशिराम घटे यांचे कुटुंब. वेकोलीत शेतजमीन गेल्यामुळे भूमिहीन झालेले तुळशीराम घटे हे सास्ती येथे वास्तव्यास आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तुळशीराम घटे यांची शेती पोवणी-३ या कोळसा खाणीत गेली. प्रकल्पग्रस्त असल्यामुळे आशाला नोकरी मिळावी, अशी त्यांची इच्छा. आशाने नोकरीसाठी प्रयत्न केले. वेकोली अधिकाऱ्यांकडे नोकरीसाठी कागदपत्रांसह चकरा मारायची. अशातच एक दिवस ती विष प्राशन करून आपली इहलोकाची यात्रा संपविते. असे काय घडले, ज्यामुळे आशाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली? अमरावतीच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आरोपींना अटक झाली. आशाच्या पदरी मात्र निराशा का? या प्रश्नाचे उत्तर पोलीस प्रशासन शोधून देईल काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.
राजुरा तालुक्यातील साखरी येथील तुळशीराम घटे हल्ली मुक्काम सास्ती ता. राजुरा यांची शेतजमीन वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत करण्यात आली. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे तुळशिराम घटे यांचे कुटुंब. वेकोलीत शेतजमीन गेल्यामुळे भूमिहीन झालेले तुळशीराम घटे हे सास्ती येथे वास्तव्यास आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना शेती अधिग्रहणाचा मोबदला मिळाला. त्यांचे वय जास्त असल्यामुळे आपल्या मुलीला आशाला नोकरी द्यावी, असे पत्र त्यांनी वेकोली व्यवस्थापनाला दिले. १९ वर्षीय आशा मोठ्या आशेने आता नोकरीसाठी प्रयत्न करू लागली. दरम्यान, लालफीतशाहीत तिला वाईट अनुभव आला. २२ मार्च रोजी ती वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्याकडे गेली होती. यानंतरच तिची प्रकृती बिघडली. २३ मार्च रोजी तिच्या स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. २७ मार्चला प्रकृती अधिक खालावल्याने तिला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान ३१ मार्च रोजी आशाची प्राणज्योत मालवली. आशाने विष घेतले असावे. त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे हे विष हळूहळू आपला प्रभाव दाखवत होते, अखेर यात तिचा बळी गेला. आशाचा मृत्यू विषामुळे झाला असला तरी ते तिने का घेतले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या घटनेनंतर नेहमीप्रमाणेच पोलीसही तक्रार घेण्यास टाळाटाळ करू लागले. याचाच अर्थ पोलीस आशाला न्याय देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आशाचा मृतदेह घेऊन वेकोली कार्यालय गाठले; मात्र अद्यापही आशाला न्याय मिळाला नाही. वेकोलीच्या अधिकाऱ्यांमुळे आशाचा बळी गेल्याचा आरोप आशाच्या वडिलाचा आहे; मात्र पोलीस यंत्रणा हे प्रकरण दडपण्याच्या मानसिकतेत सुरुवातीपासूनच असल्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कोण करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
२२ मार्चला काय घडले?
२२ मार्च रोजी आशा घटे ही वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्याकडे गेली होती. यानंतरच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, तिच्यासोबत काय घडले, यामुळे आशाने टोकाचे पाऊल उचलले, याचा शोध पोलीस का घेत नाही. पोलिसांचे हात वेकोलीने बांधले काय? हे प्रश्न खाकीवर संशय निर्माण करायला लावणारे आहे.