पदोन्नतीतील आरक्षणासाठी कृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:19 AM2021-06-28T04:19:50+5:302021-06-28T04:19:50+5:30
चंद्रपूर : मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आठ विविध संघटना मिळून तयार ...
चंद्रपूर : मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आठ विविध संघटना मिळून तयार केलेल्या आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंत टॉकीज चौक, छोटा बाजार चौक, जाटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जनआंदोलनाचे नेतृत्व बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष तथा आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक राजकुमार जवादे यांनी केले.
मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने मागासवर्गीयांवर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी राज्य अध्यक्ष राजकुमार जवादे, कृती समितीचे राज्य प्रतिनिधी सुभाष मेश्राम, ॲड. रवींद्र मोटघरे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या विभागीय अध्यक्षा कविता मडावी, बहुजन वंचित आघाडीचे विदर्भ संघटक राजू झोडे, जिल्हा सचिव जयदीप खोब्रागडे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे शांताराम उईके, धनगर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बुचे, आयबीसेफचे एस. डी. सातकर, गोंडवाना सामाजिक कल्याण संस्थेचे जे. एस. गावंडे, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे राजस खोब्रागडे, गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे सारंग कुमरे, आरोग्य कर्मचारी कल्याण महासंघाचे प्रकाश वाघमारे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे देव नगराळे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे शालिक माऊलीकर यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.