पाणी गुणवत्तेच्या कामात दिरंगाई झाल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:23 AM2019-01-25T00:23:48+5:302019-01-25T00:26:54+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द , स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे, यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांनी पाणी गुणवत्तेबाबतची कामे वेळेत पूर्ण करावीत. जे यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी लागेल, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द , स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे, यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांनी पाणी गुणवत्तेबाबतची कामे वेळेत पूर्ण करावीत. जे यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी लागेल, असा गंभीर इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या जनपथ सभागृहात सर्व पंचायत समीत्यांचे आरोग्य विस्तार अधिकारी यांची त्यांनी बैठक बोलाविली होती. यावेळी ते अधिकाऱ्यांना सूचना देत होते. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, कनिष्ठ प्रशासनिक अधिकारी कल्पना सूर्यवंशी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजय धोटे, पाणी गुणवत्ता सल्लागार अंजली डाहुले, माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ प्रवीण खंडारे, नरेंद्र रामटेके उपस्थित होते.
पापळकर पुढे म्हणाले, पाणी गुणवत्ता विषयाबाबत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाºयांनी कामामध्ये कसूर करता कामा नये. शासनाने जी ही मोठी यंत्रणा उभी केली आहे, तिचा उपयोग गावाच्या विकासासाठी केला पाहिजे.
गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता प्रयत्नरत राहिले पाहिजे. अधिकाऱ्यांनी गावामध्ये जावून वेळोवेळी ग्रामस्थांना स्वच्छता व पाणी गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन करुन त्या गोष्टी त्यांना करायला लावाव्यात. गावातील पाण्याचे स्त्रोत जिथे असतात, त्या स्त्रोताजवळ घाण असेल तर ग्रामस्थांना त्याबाबत मार्गदर्शन करुन पाणी गुणवत्तेबाबत माहिती द्यावी, अशा सूचनाही पापळकर यांनी केल्या. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी विजय पचारे ग्रामीण भागातील पाणीस्रोत दूषित होऊ नये, याकरिता काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले.
खताच्या खड्ड्यांचा लिलाव करा
गावामध्ये अनेक ठिकाणी खताचे खड्डे असतात. ते गावातील लोकांना त्वरित काढण्यास सांगावे. जर ऐकत नसतील तर ग्रामपंचायतीने त्याचा लिलाव करुन टाकावा. गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता व गावात कोणताही जलजन्य आजार होऊ नये किंवा साथीचे आजार पसरु नये, याकरिता जिल्हा परिषद यंत्रणांनी विस्तार अधिकारी (आरोग्य), ग्रामीण पाणी पूरवठा उपविभागातील पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा सल्लागार, बीआरसी, आरोग्यसेवक, जलसुरक्षक यांनी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याचे स्रोत चांगले राहतील, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जितेंद्र पापळकर म्हणाले.