बोंडच्या अतिक्रमणावर कारवाई सुरु
By admin | Published: July 11, 2016 12:47 AM2016-07-11T00:47:21+5:302016-07-11T00:47:21+5:30
बोंड येथील संरक्षित जंगलातील जागेवरील अतिक्रमण प्रकरणी वनविभागाची कारवाई सुरु झाली असून वनविभाग ...
मंगळवारी बयाण : अतिक्रमणधारक काय बोलतात याकडे लक्ष
घनश्याम नवघडे नागभीड
बोंड येथील संरक्षित जंगलातील जागेवरील अतिक्रमण प्रकरणी वनविभागाची कारवाई सुरु झाली असून वनविभाग मंगळवार १२ जुलै रोजी या शेतकऱ्यांचे बयाण नोंदविणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
बोंड येथील संरक्षित जंगलात तेथीलच ३१ शेतकऱ्यांनी जवळपास १०० एकर जमिनीवर अवैध अतिक्रमण केले होते आणि ही अतिक्रमणाची प्रक्रिया जवळपास सहा महिन्यापासून सुरु होती. विश्वसनीय माहितीनुसार अतिक्रमण करण्यासाठी एकेका शेतकऱ्याने ७० ते ८० हजार रुपयापर्यंत खर्चही केला होता. तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयात नव्यानेच रुजू झालेल्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांच्या लक्षात ही बाब येताच हे अतिक्रमण हटविण्यात आले. महत्वाच्या मुनष्यबळासह वनविभागाला यासाठी दोन लाखांचा खर्चही आला होता. ही अतिक्रमण हटाव मोहीम संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.
या अतिक्रमणास जबाबदार कोण, याचा तपास वनविभाग करणार असून या तपासाचाच एक भाग म्हणून वनविभाग अतिक्रमणाधारक शेतकऱ्यांचे बयाण नोंदविणार आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार या शेतकऱ्यांना त्या भागाच्या क्षेत्रसहाय्यकामार्फत नोटीस देण्यात आली आहे.
या चौकीत हे अतिक्रमण किती दिवसांपासून करण्यात आले. याची प्रामुख्याने तपासणी होणार असली तरी अतिक्रमणधारक आणखी काही वेगळे बयाण देतात काय, याकडेही अनेकांचे लक्ष वेधले आहे. अतिक्रमण धारकांचे हे बयाण नोंदविण्यात आल्यानंतर हा संपूर्ण अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असून या अहवालाचा निष्कर्ष काय निघतो, यावर कारवाईचे भवितव्य ठरणार असल्याचे यासंदर्भात समजते. दरम्यान, हे अतिक्रमण केवळ पाच सहा महिन्यातील नाही तर गेल्या तीन-चार वर्षापासूनचे आहे. या शेतीत अनेकांनी यापूर्वी हंगामही केला आहे, अशी माहिती गावकऱ्यांकडून लोकमतला देण्यात आली.