ठाणेदारांच्या कारवाईने दारुविक्रीला लगाम
By admin | Published: October 7, 2016 01:14 AM2016-10-07T01:14:17+5:302016-10-07T01:14:17+5:30
दुर्गापूर गावात अवैधपणे विक्री होणाऱ्या ताडी व दारुमुळे युवकाला प्राण गमवावा लागला.
दुर्गापूर पोलीस ठाणे : अवैध व्यवसायही पाडले बंद
दुर्गापूर : दुर्गापूर गावात अवैधपणे विक्री होणाऱ्या ताडी व दारुमुळे युवकाला प्राण गमवावा लागला. तर कित्येकांचे संसार उद्धवस्त झाल्याच्या घटना ताज्या आहेत. एवढ्यातच दुर्गापूर ठाण्यात रुजू झालेल्या ठाणेदारांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत अशा अवैध दारु व ताडी विक्रीवर लगाम लावल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दुर्गापूर गावात सुरुवातीला छोटेखाणी पोलीस चौक होती. त्यावेळेस येथे गंभीर गुन्ह्याचे प्रमाण सातत्याने वाढतच होते. परिणामी या चौकीचे पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. त्यामुळे काही अंशी अशा गंभीर गुन्ह्यावर चाप बसला. मात्र अवैध व्यवसाय फोफावलेलेच होते. या अवैध व्यवसायांपैकी २४ तास राजरोसपणे ठिकठिकाणी मिळणारी दारु व ताडीमुळे येथील अनेक युवक व्यसनाच्या अधीन झाले होते. यापैकी क्लोरोफार्म नवसागर, सॅक्रीन पासून बनविलेल्या कृत्रिम ताडीचा तर येथील युवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडत होता.
या विषारी ताडीच्या प्राशनाने येथील चार युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येकाचे संसार उद्धवस्त झाले व काही संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होते. हे एक कटू सत्य होते. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. कित्येक लोकांच्या अशा तक्रारीही होत्या. २००९ ते जुलै २०१५ पर्यंत ताडी विक्रेत्यांवर १९ गुन्हे दाखल करून पोलीस कारवाई करण्यात आली. मात्र ताडी विक्रेत्यांनी सर्रास ताडीची विक्री करून लोकांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा गोरखधंदा सुरुच ठेवला होता.
मात्र सप्टेंबर २०१५ मध्ये दुर्गापूरात नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार आर. के. सिंगनजुडे यांनी दखल घेत एका महिन्यात ताडीचे दुकान बंद केले. त्यानंतर थेट ताडोबा मार्गावर त्याच दुकानातून अवैध दारु विक्री सुरू झाली. त्यावरही कारवाई करीत एका वर्षात १५ गुन्हे दाखल केले. याशिवाय अगदी ताडोबा मार्गावर आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाच्या वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट पुढे खुलेआम दारु विक्री करणाऱ्या महिलेवर अनेकदा पोलीस कारवाई तिलाही दारुविक्री बंद करण्यात ठाणेदारांनी भाग पाडले. त्यामुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)