काँग्रेस बंडखोरांवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 12:49 AM2016-11-14T00:49:31+5:302016-11-14T00:49:31+5:30
येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बल्लारपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या...
विजय वडेट्टीवार : बल्लारपूर पेपर मिलची समस्या मांडणार
बल्लारपूर : येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बल्लारपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हा प्रभारी एस.क्यू. झामा यांनी दिला. तसेच यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार यांनी बल्लारपूर पेपर मिलचा प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडण्याची ग्वाही दिली.
काँग्रेसच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आ. वडेट्टीवार आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. आ. वडेट्टीवार म्हणाले की, आठ हजार कर्मचाऱ्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न बल्लारपूर पेपर मिलमध्ये आर्थिक संकट आणि वन विभागाकडून मिळत नसलेल्या बांबूमुळे उद्भवला आहे. हा प्रश्न निकाली लागेल, असे समजून आपण गप्प बसलो होतो. पण, आता धीर धरणे शक्य नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तो आपण नेटाने उचलू आणि बांबू या कच्चा मालासंबंधात वनविभाग आणि शासन, पेपर मिलची अडवणूक का करीत आहे, याचा जाब विचारून त्यांना पेपर मिलला बांबू देण्याकरिता भाग पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले. आ. वडेट्टीवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री या विधानसभा क्षेत्राचे आमदार असताना बांबूच्या अडवणुकीचा प्रश्न उद्भवूच नये, असे सांगत राजकारण बाजूला ठेऊन, लोकांच्या पोटापाण्याशी निगडीत समस्या कशा दूर होईल, याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवे. पण, ते झाले नाही ही खेदाची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात विकासाची सर्व कामे आपणच केली अशी बढाई मारत भाजप साऱ्या कामाचे श्रेय घेत सुटले आहे. काम कमी, श्रेयाच्या गोष्टी अधिक असे राज्यात सुरू आहे. भाजपा सर्वत्र चुकीचे धोरण राबवित आहे. त्यामुळे, व्यापारी, कामगार, शेतकरी आज चिंतेत व अडचणीत पडले आहेत. आता, ५०० व एक हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर सामान्य लोक मोठ्या अडचणीत आले आहेत, आरोप वडेट्टीवार यांनी केला.
बल्लारपूर नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काही काँग्रेस जणांनी बंडखोरी केली आहे. त्यांचा समाचार घेऊन, त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे जिल्ह्याचे प्रभारी एस.क्यू. झामा म्हणाले. तसेच पेपर मिलचा बांबू प्रश्न लवकर निकाली न निघाल्यास आंदोलन उभारण्यात येईल, असेही झामा यांनी सांगितले.
या पत्रपरिषदेत माजी आमदर सुभाष धोटे, काँग्रेसचे नगराध्यक्षाचे उमेदवार वेंकटेश बाल बैरय्या, नगराध्यक्षा छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, रणजीत सिंह अरोरा, देवेंद्र आर्य, जिल्हा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, अश्विनी खोब्रागडे, करीम भाई आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)