नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:31 AM2021-08-13T04:31:34+5:302021-08-13T04:31:34+5:30

चंद्रपूर : गणेशोत्सवासह विविध उत्सवांत मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...

Action will be taken against those who sell idols without registration | नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

googlenewsNext

चंद्रपूर : गणेशोत्सवासह विविध उत्सवांत मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही नोंदणी आपापल्या परिसरातील झोन कार्यालयात करायची आहे. तसेच पीओपी मूर्तीची विक्री, आयात आणि निर्मिती करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.

मूर्ती विक्री करणाऱ्या सर्व मूर्तिकारांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी २०० रुपये आणि डिपॉझिट रक्कम तीन हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर डिपॉझिट रक्कम परत देण्यात येईल. नोंदणीसाठी झोननिहाय मुख्य स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मूर्ती विक्रीच्या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. नोंदणी न करता मूर्ती विकताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाणार आहे.

कारवाईकरिता सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात, सहायक अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, मुख्य स्वच्छता निरीक्षक, पोलीस प्रतिनिधी, इको-प्रो सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मूर्तिकार प्रतिनिधी यांची समिती स्थापन करून तिन्ही झोनमध्ये पथक तैनात राहणार आहे.

मूर्ती विकताना विक्रेते आणि खरेदी करणाऱ्या भाविकांनी मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे यांचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

बाॅक्स

केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी कडक अंमलबजावणी होणार आहे. गणेशमूर्तींच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.

Web Title: Action will be taken against those who sell idols without registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.