जंगलालगतच्या शेतात वणवा लावल्यास होईल कारवाई; वनविभागाने शेतकऱ्यांना बजावल्या नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:51 IST2025-03-18T13:49:20+5:302025-03-18T13:51:46+5:30
यंदा वनविभाग कडक : २ वर्षे कारावासाची शिक्षाही जंगलात वणवा लावणाऱ्याला ठोठावली जाऊ शकते.

Action will be taken if fire blown in fields adjacent to the forest; Forest Department issues notices to farmers
प्रवीण खिरटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शेतात उन्हाळ्यामध्ये पिके नसतात. शेतीची मशागत करताना शेतकरी शेतात वणवा लावतात. हा वणवा कधीकधी जंगलात जात असतो. त्यामुळे जंगलातील झाडे व वन्यप्राण्यांना त्याची मोठ्या प्रमाणात झळ पोहोचते. सध्या राज्यातील वनविभाग अॅक्शन मोडवर आला असून, जंगलालगतच्या शेतामध्ये वणवा लावण्याआधी वनविभागास कळवावे, अन्यथा वनविभाग कायदेशीर कारवाई शेतकऱ्यावर करणार आहे. याबाबतच्या नोटीस वनविभागाने शेतकऱ्यांना दिल्या आहेत.
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. पानझळ सुरू झाली असल्याने झाडाची पाने पूर्णतः सुकलेली आहेत. जंगलात मोहफूल वेचताना तसेच तेंदूपत्ता गोळा करताना आग लावण्याचे प्रकार आढळून येतात. तसेच शेतकरी शेतातील गवत पुढील हंगामात येऊ नये, याकरिता शेतातील धुन्ऱ्यावर वणवा लावतात. वणवा लावल्यानंतर ती आग पूर्णपणे विझली की नाही, याची शहानिशा कुणीच करताना दिसत नाही. आग विझली नाही तर ती हवेने जंगलात पसरते. अशा प्रकारे जंगलाला आग लागल्याच्या अनेक घटना उन्हाळ्यामध्ये घडत असतात. एकदा जंगलाला आगेची झळ बसल्यास नवीन रोपे तयार होत नाही. वनस्पती नष्ट होतात. वन्यप्राणी आगीमुळे आपला मूळचा अधिवास सोडून इतरत्र भटकंती करतात.
अशी आहे शिक्षेची तरतूद
वनविभागात वणवा लावताना पूर्वसूचना दिली नाही, हा वणवा जंगलात पोहोचलास त्या शेतकऱ्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकसानीची किंमत आणि पाच हजार रुपये दंड व दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जाते.
जाळरेषा ठरते महत्त्वाची
जाळ रेषेमुळे वणवा जंगलात पसरू शकत नाही. वनातील विविध प्रजातीच्या वनस्पतीचे संरक्षण होण्यास यामुळे मोठी मदत होते. त्यामुळे वनविभागातर्फे उन्हाळ्यात दरवर्षी अशा प्रकारे जाळ रेषा काढली जाते. तीन मीटर, सहा मीटर, नऊ मीटर, बारा मीटर आधी प्रकारानुसार जाळ रेषा काढली जाते. ती महत्त्वाची असते.
"जंगलालगतच्या शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शेतात वणवा लावण्यापूर्वी वनविभागास कळवावे. त्यामुळे वनविभाग सहकार्य करेल."
- सतीश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा