बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:56 PM2017-08-19T23:56:31+5:302017-08-19T23:56:55+5:30
जिल्ह्यातील पाणीटंचाई सारख्या संकटावर प्रभावीपणे मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील पाणीटंचाई सारख्या संकटावर प्रभावीपणे मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केल्या. सर्व सोयीसुविधा असताना विविध कारणे दाखवून योजना कार्यान्वित करण्यात शासकीय यंत्रणा निष्क्रीयता दाखवत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांना धारेवर धरून बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला आ. अॅड. संजय धोटे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, निवासी उपजिल्हाधिकारी नावाडकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गजभे, सनियंत्रण समितीचे सदस्य खुशाल बोंडे, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत व वरोरा, चंद्रपूर, राजुरा व अन्य तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील संवर्ग विकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, जिल्हा दक्षता व पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ना. अहीर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विषयक योजनांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पेयजल योजनांबाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी या सर्व योजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सुचना त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केली होती.
या सूचनेनुसार जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकाºयांच्या मार्फत बंद असलेल्या व विविध कारणाने कार्यान्वित न झालेल्या पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर अहवाल शनिवारच्या आढावा सभेत केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर सादर केला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.