शेतकऱ्यांची फसवणूक करणारी टोळी सक्रीय
By admin | Published: May 22, 2016 12:34 AM2016-05-22T00:34:56+5:302016-05-22T00:34:56+5:30
तालुक्यात कर्जाच्या नावाखाली शेतीची विक्री करून फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाली आहे.
कर्जाच्या नावाखाली केली जाते शेतीची विक्री
दोन वर्षांत १५ गुन्हे दाखल :
आशिष घुमे वरोरा
तालुक्यात कर्जाच्या नावाखाली शेतीची विक्री करून फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाली आहे. कमी वेळात संपत्ती मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणून काही लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी अनेक शेतकऱ्यांची शेती गिळकृंत करीत असल्याच्या पोलिसात तक्रारी आहेत.
वरोरा पोलीस
ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये १७ प्रकरणे उघडकीस आले आहेत. कुठल्या न कुठल्या मार्गाने शेतकरी त्यांच्या जाळ्यात फसत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी तर कुटुंबातील सदस्याच्या आजारामुळे बेजार झालेला शेतकरी राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांकडे जातो व शेती गहाण करण्याच्या नावाखाली तात्पुरती विक्री म्हणून शेतीची विक्री करुन देतो. तसेच एखाद्या शेतकऱ्याला एक लाख रुपयांची गरज असल्यास विक्री पत्रावर शासनाच्या दरानुसार विक्री करावी लागते. म्हणून शासनदरानुसार किंमत मिळाली असे लिहून घेतल्या जाते. मध्यस्थी करणाऱ्या दलालाची सही साक्षिदार म्हणून घेतली जाते. जेव्हा संबंधित शेतकरी घेतलेले पैसे परत करायला जातो, तेव्हा लिहून दिलेली रक्कम अगोदर परत कर, असे सांगून त्याला परत पाठविल्या गेल्याचे अनेक प्रकार घडलेले आहे. वाममार्गाने शेकडो एकर शेतजमीन स्वत:च्या व आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने केल्याचीही चर्चा शहरात आहे. ५० हजारांचाही व्यवहार करण्यासाठी आता शासनाने पॅन कार्डची सक्ती केली असताना करोडो रुपयांची जमविलेली माया आयकर विभागाला दिसत नाही का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करु लागले आहेत.
एकीकडे पिडीत शेतकरी न्याय मागायला ठाण्याचे उंबरठे झिजवित आहेत, तर दुसरीकडे या भामट्यांना पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांकडून व्हीआयपी सेवा दिली जात आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी झाल्यास आयकर विभाग, पोलीस विभाग, दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मोठे मासे जाळ्या बाहेर
वरोरा तालुक्यात ठिकठिकाणी जमिन,प्लॉट कर्जाच्या नावाखाली स्वत:च्या नावाने करून घेणाऱ्या टोळ्या सक्रीय असल्या तरी अद्याप यातील मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागलेले नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. सामान्य गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली जातात. शेतकऱ्याच्या अज्ञाानाचा फायदा घेत शेत गहाण ठेवण्याच्या नावाखाली शेतीची मूळ विक्री करून त्या शेतीवर हक्क सांगितला जातो. त्यानंतर धमक्या देऊन प्रसंगी पोलिसांची भिती दाखवून गरीब शेतकऱ्याला दमदाटी, करण्याच्या घटनाही परिसरात घडत आहेत. मूळ मालक चुकून पोलिसात तक्रार करायला गेला तर खासगी मामला असल्याचे सांगून सरळ न्यायालयाचा रस्ता दाखविण्यात येत आहे. न्यायालयात वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित राहतात. एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याच्या अशाच एका प्रकरणाची शहरात चर्चा आहे.