कोविशिल्डअभावी हजारो नागरिकांचा अडला दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:13+5:302021-07-02T04:20:13+5:30
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २५० पेक्षा अधिक केंद्र तयार केले. १८ वर्षांपुढील वयोगटालाही लस दिली जात आहे; पण ...
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २५० पेक्षा अधिक केंद्र तयार केले. १८ वर्षांपुढील वयोगटालाही लस दिली जात आहे; पण जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचा पुरेसा लससाठा उपलब्ध झाला नाही. परिणामी, दुसरा डोस घेणारे प्रतीक्षा करीत आहेत. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला डोसही पूर्ण केला आहे. लशीचे फायदे लक्षात आल्याने युवक-युवती केंद्रांवर गर्दी करीत आहेत.
चंद्रपुरात चार केंद्रांवरच लसीकरण
दोन दिवसांपासून चंद्रपुरात केवळ चार- पाच केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. डोस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवावे लागत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. गुरुवारी ज्युबिली हायस्कूल, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय आयटीआय वरोरा नाका चौक आणि एरिया हॉस्पिटल लालपेठ कॉलरी या चार केंद्रांवर लसीकरण झाले. त्यातही पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सिन लसीचाच होता. त्यामुळे कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यास आलेले घरी परत गेल्याचे दिसून आले.
कोव्हॅक्सिनबाबत नागरिकांत गैरसमज
चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासूनच कोविशिल्ड लस उपलब्ध झाली. त्या तुलनेत कोव्हॅक्सिनला विलंब झाला. या दोन्ही लस १०० टक्के गुणकारी व सुरक्षित असल्याचे केंद्र व राज्य शासनाकडून सांगितले जात आहे. आरोग्य यंत्रणाही लोकांमधील गैरसमज दूर करीत आहे; परंतु कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले नाही. अनेकांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे जनजागृतीसाठी प्रशासनाकडून नवीन स्ट्रॅटेजी तयार करण्याची गरज आहे.