रामाळा तलाव सरोवर संवर्धन योजनेत समाविष्ट करा
By admin | Published: January 8, 2016 01:54 AM2016-01-08T01:54:07+5:302016-01-08T01:54:07+5:30
चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरावर गोंड राजाचे राज्य होते.
महेश मेंढे यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरावर गोंड राजाचे राज्य होते. गोंडराजांनीच या शहराच्या संरक्षणासाठी परकोट बांधला व त्याकाळी बांधण्यात आलेला रामाळा तलाव आजही ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत आहे. मात्र चंद्रपूर शहराचे सौंदर्य खुलविणाऱ्या या तलावाची वाटचाल जर्जरतेकडे सुरू आहे.
ऐतिहासिक वास्तू टिकविण्यासाठी पुरातत्व खाते काम करीत आहे. मात्र रामाळा तलावासारखे ऐतिहासिक तलावाचे संवर्धन करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने या तलावाचे संवर्धन व्हावे, चंद्रपूरकरांना हा तलाव ऐतिहासिक वैभवाची साक्ष म्हणून कायम स्मरणात रहावा, यासाठी रामाळा तलावाला राज्य सरोवर संवर्धन योजनेत समावेश करुन तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, या मागणीचे निवेदन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे प्रमुख महेश मेंढे यांनी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले आहे.
महेश मेंढे यांनी निवेदना म्हटले आहे, चंद्रपूर शहरातील मनपाच्या हद्दीत असलेला रामाळा तलाव व संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या तलावालगतच रामाळा उद्यानही आहे.
शहरात आधीच बगिचे कमी आहेत. अशा परिस्थितीत शहराचे सौंदर्य खुलविणारा व शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा रामाळा तलाव जपणे आवश्यक असल्यामुळे या तलावाला राज्य सरोवर संवर्धन योजनेत समाविष्ठ केल्यास तलावाच्या संवर्धनाकरीता २५ कोटीचा निधी उपलब्ध होऊ शकतो.
त्यामुळे शासनास जिल्हा प्रशासनाकडून तसा प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी महेश मेंढे यांनी केली. यावेळी दिनेश चोखारे, शिवा राव, सचिन कत्याल, नरेश मोटवाणी, सौरभ बुरेवार, सचिन रणवीर, महेश, निलेश मून आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)