गुलवाडे हॉस्पिटलची कोविड रुग्णांकडून ५४ लाख ७२ हजारांची अतिरिक्त वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:18+5:302021-07-28T04:29:18+5:30

कोरोना संसर्ग उच्चांकावर असताना प्रशासनाने खासगी हॉस्पिटल्सनाही कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिली होती. शिवाय, रुग्णांची आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी ...

Additional recovery of Rs 54.72 lakh from Gulvade Hospital's Kovid patients | गुलवाडे हॉस्पिटलची कोविड रुग्णांकडून ५४ लाख ७२ हजारांची अतिरिक्त वसुली

गुलवाडे हॉस्पिटलची कोविड रुग्णांकडून ५४ लाख ७२ हजारांची अतिरिक्त वसुली

Next

कोरोना संसर्ग उच्चांकावर असताना प्रशासनाने खासगी हॉस्पिटल्सनाही कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिली होती. शिवाय, रुग्णांची आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी उपचाराचे दर ठरवून देयके तपासण्याकरिता महानगर पालिकेने लेखापरीक्षक नियुक्त केले. ही यंत्रणा अजूनही कायम आहे. चंद्रपुरातील डॉ. गुलवाडे हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांवरील उपचाराच्या देयकांची लेखापरीक्षकांनी तपासणी केली. २० ते २५ मे २०२१ या कालावधीत या हॉस्पिटलने आकारलेल्या चार देयकांमध्ये रुग्णांकडून ५४ लाख ७२ हजार १५० रुपये अतिरिक्त वसूल केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले. ही अतिरिक्त रक्कम तातडीने संबंधित रुग्णांना परत करण्याची नोटीस आयुक्त राजेश मोहिते यांनी २० जुलै २०२१ रोजी गुलवाडे हॉस्पिटलला बजावली आहे.

बॉक्स

प्रशासनाने गुन्हा दाखल करावा - काँग्रेसची मागणी

कोविड रुग्णांकडून मनमानी देयक वसूल करणारे डॉ. मंगेश गुलवाडे हे भाजपचे चंद्रपूर महानगर अध्यक्षपदावर आहेत. शिवाय, ‘आयएमए’चे अध्यक्ष व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी प्रोफेसर म्हणून सेवा देतात. प्रशासनाकडून त्यांनी ४० बेड्सची परवानगी घेऊन थेट ८० बेडेड कोविड रुग्णालय सुरू केले. त्यातही रुग्णांकडून ५४ लाख ७२ हजार १५० रुपयांची अतिरिक्त वसुली केली. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी सर्व पदांचा राजीनामा द्यावा आणि महापालिकेने नोटिसीवर न थांबता पोलिसांत गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनीता लोढीया, प्रदेश उपाध्यक्ष (एसटी सेल) अश्विनी खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष अनू दहगावकर, शहराध्यक्ष शलिनी भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनातून दिला आहे.

Web Title: Additional recovery of Rs 54.72 lakh from Gulvade Hospital's Kovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.