शेळीगट वाटपातील शेळयांचा पत्ता गूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:23+5:302020-12-11T04:55:23+5:30
मूल :महिलांना रोजगारातून आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून ग्रामसंघाला भरमसाठ अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसंघामार्फत दहा ...
मूल :महिलांना रोजगारातून आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून ग्रामसंघाला भरमसाठ अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसंघामार्फत दहा शेळया व एक बोकड लाभार्थ्यांना आणून देण्यात आले होते. सदर योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर २०१९ आणि मार्च २०२० मध्ये शेळयांचे वाटपही करण्यात आले. मात्र यातील अनेक लाभार्थ्यांनी शेळया विकल्याचे समोर आले आहे. सदर लाभार्थ्यामध्ये पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकासह काही शासकीय कर्मचाºयांच्या पत्नीचाही समावेश आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांनी दिले होते. मात्र त्या प्रकरणाची चौकशी अजूनही थंडबस्त्यात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने महिलांना स्वयंरोजागर देण्याच्या दृष्टीने चांदा ते बांदा विकास योजनेंतर्गत १० शेळया आणि एक बोकड असा शेळी गट वाटप करण्याची योजना आहे. या योजनेतील खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के तर अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना ९० टक्क्यापर्यंत शासनाकडून अनुदान दिल्या जाते. मूल तालुक्यातील गडीसुर्ला, जुनासुर्ला, बेलघाटा, मुरमाडी, चिरोली, भगवानपूर आणि जानाळा या सात गावातील सुमारे ७८ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांना डिसेंबर २०१९ आणि मार्च २०२० मध्ये शेळी आणि बोकड वाटपही करण्यात आलेले आहे. त्या शेळयांचा तीन वर्षांचा विमासुध्दा काढण्यात आलेला आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या दिशादर्शक नियमानुसार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ न देता सरळसरळ लाभ देण्यात आलेला आहे. अनेक लाभार्थ्यांना शेळी पालन व्यवस्थापन व चारा उत्पादन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक होते. परंतु यातील अनेक लाभार्थी अप्रशिक्षीत आहेत. यामुळे शेळयांचे संगोपन कशा पध्दतीने करतील, याचा थोडाही विचार वाटप करणाºया अधिकाºयांनी केलेला नाही.
सदर योजनेचा लाभ घेणाºया लाभार्थ्याकडून किमान तीन वर्षे शेळयांचे संगोपन करण्याबाबत बंधपत्र लिहून घेणे आवश्यक होते. मात्र तसे केले नाही.आता या योजनेतील शेळया अनेकांनी विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र सध्या ती थंडबस्त्यात आहे.
बॉक्स
मूल तालुक्यात ८४७ शेळ्यांचे वाटप
तालुक्यात ७८ लाभार्थ्यांना ८४७ शेळया आणि बोकड वाटप करण्यात आलेले आहे. सदर शेळया व बोकड हे अमरावती, जोळमोहा यवतमाळ, लाखांदूर येथून आणण्यात आलेले असून यातील ३५ शेळयांचा विविध आजारेने मृत्यू झाला आहे. परंतु उर्वरित शेळया गेल्या कुठे, असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे.