जिल्ह्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:01:25+5:30
२१ लाख लोकसंख्या असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत तीन लक्ष ९३ हजार रेशन कार्डधारक आहे. या माध्यमातून १५ लक्ष नागरिकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. यामध्ये दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदळाचा पुरवठा केला जातो. सोबतच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. अशा ४० हजार नागरिकांची नोंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील १८ दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये. मात्र या काळात गरिबातील गरीब जनतेला अन्नधान्य पुरविण्याची व्यवस्था नियोजित असून पुरेसा अन्नसाठा जिल्ह्यात आहे. नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता राहील. यासाठी प्रशासन तयार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.
मंगळवारी सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. यासंदर्भात राज्य शासनाचे सविस्तर निर्णय प्रतीक्षेत आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, रेशन दुकानामार्फत होणारा पुरवठा, याबाबत जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू
महानगरपालिकेने मोठया प्रमाणात शहरात निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. सोबतच येणाºया प्रत्येक मुख्य रस्त्यावर कडेकोट नाकाबंदी केली आहे. शिवाय छोटे मार्ग नागरिकांची गर्दी वाढू नये बंद केले आहे. नागरिकांनी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करावे, लॉकडाऊन संपेपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
१५ लाख लोकांना धान्याचा पुरवठा
२१ लाख लोकसंख्या असणाºया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत तीन लक्ष ९३ हजार रेशन कार्डधारक आहे. या माध्यमातून १५ लक्ष नागरिकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. यामध्ये दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदळाचा पुरवठा केला जातो. सोबतच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. अशा ४० हजार नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यांनादेखील जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच गावागावांमध्ये शासकीय यंत्रणेसोबत स्वयंसेवी संस्था निराश्रित, निराधार, बेघर लोकांना तयार अन्न पुरवित आहेत. या परिस्थितीत कोणाची उपासमार होत असेल किंवा अन्नधान्यापासून वंचित असल्यास जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता अशा नागरिकांना मदत करण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकांचा उपयोग करावा ,असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
अखेर ते दोनही दाम्पत्य विश्रामगृहात क्वारंटाईन
भद्रावती : स्थानिक संताजी नगर येथे मुंबईवरुन आलेल्या त्या दोन दाम्पत्यांना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान स्थानिक विश्रामगृहात क्वारंटाईन करण्यात आले. सोमवारी स्थानिक संताजी नगर येथे मुंबईवरुन दोन दाम्पत्य चारचाकी वाहनाने आले होते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगीसुध्दा होती. सोमवारी तहसील कार्यालयामार्फत ग्रामीण रुग्णालयाच्या चमूने त्यांची तपासणी करुन राहत्या घरीच क्वारंटाईन करुन ठेवले होते. मात्र मंगळवारी तहसीलदार हे ग्रामीण रुग्णालयाची चमू घेऊन त्यांच्या घरी आले व मुंबईवरुन आलेल्या त्या दोन्ही दाम्पत्यांना येथील विश्रामगृहात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी हलविण्यात आले. आता पुढील १४ दिवस हे दाम्पत्य क्वारंटाईन करुन ठेवणार असल्याची माहिती आहे.
नव्या ५० पैकी ३२ नमुने निगेटिव्ह
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ५८ नागरिकांची नोंद करण्यात आली. ५० स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३२ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. १८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.
२४,८०३ नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्ण
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २७ हजार ६६२ आहे. यापैकी दोन हजार ८५९ नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांचा होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २४ हजार ८०३ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ५५ आहे. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
आतापर्यंत ६५९ वाहने जप्त
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला आहे. प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावकऱ्यांच्या मदतीने येणाऱ्यांची नोंद केली जात आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांमधून घुसखोरी होणार नाही, याकडे लक्ष वेधण्याचे, तसेच रस्त्यावर दुचाकी वाहनांची संख्या कमी करण्याचे व विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत ६५९ वाहने जप्त करण्यात आली असून १४५ केसेस करण्यात आले आहे. ४३ लोकांना अटक करण्यात आली असून ही संख्या दुर्दैवी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
रुग्णांची तपासणी मोहीम
जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात श्वसनाच्या आजाराच्या संदर्भात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. १०० डिग्री पेक्षा अधिक असणारा ताप, खोकला श्वसनासाठी होत असलेला त्रास कोणाला असल्यास यासंदर्भात नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हामध्ये श्वसनाच्या संदर्भातील रुग्णांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.कोणत्याही रुग्णाला अशा पद्धतीने अधिक त्रास होत असल्यास आवश्यक दूरध्वनी करून १०८ सुविधा घरपोच रुग्णाला रुग्णालयापर्यंत तपासणीसाठी घेऊन जाईल. या सुविधेचादेखील लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.