गोंडवाना विद्यापीठात हवे आदिवासी अध्यासन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:36 PM2018-03-30T23:36:12+5:302018-03-30T23:36:12+5:30
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ शनिवारी उत्साहात होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ शनिवारी उत्साहात होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करावी, अशी मागणी कवी प्रभु राजगडकर यांनी केली होती. दरम्यान, राज्यपाल तथा कुलपतीच्या सचिवानी या मागणीची दखल घेवून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले. त्यामुळे दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी अध्यासन केंद्राविषयी ठोस आश्वासन मिळेल काय, याकडे विविध विद्या शाखांचे अभ्यासक व सामाजिक कार्यर्त्यांचे लक्ष लागले आहे.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करताना गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यांना सामावून घेण्याचे ठरविण्यात आले.मात्र, व्यापक विचार बाजूला ठेवून केवळ चंद्रपूर व गडचिरोलीपुरतेच मर्यादीत करण्यात आले. या विद्यापीठाअंतर्गत २३७ महाविद्यालय येतात. हे दोन्ही जिल्हे आदिवासी बहूल असून शिक्षणाचा प्रसारही बऱ्यापैकी होत आहे. मात्र, ज्ञान व संशोधनाच्या पातळीवर अजुनही लक्षणीय कामगिरी झाली नाही. ज्या आदिवासी बहुल भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी, परधानी यासारख्या अनेक आदिवासी भाषा बोलल्या जातात.
त्यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाने आठ वर्षांनंतरही गांभीर्याने विचार केला नाही. सद्य:स्थितीत या विद्यापीठात मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि अन्य पारंपरिक नेहमीचेच विषय शिकविले जातात. पण, गोंडवाना हे अस्मितादर्शी नाव धारण करताना याच भागातील आदिवासी बोलीभाषा, साहित्य, कला, संस्कृतीचा भाषाशास्त्रीय अंगाने अभ्यास करण्यासाठी कोणताही अभ्यासक्रम नाही, अशी खंत कवी राजगडकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे पाठविलेल्या पत्रातून अधोरेखित केली होती.
देशामध्ये आदिवासी बोलीभाषा व अन्य लोकभाषांविषयी भाषातज्ज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत. बोलीभाषा व लोकभाषा जतन करण्याचा आग्रह जगभरात धरला जात आहे. पण, ज्या आदिवासी, दुर्गम नक्षलग्रस्त भागात ज्ञानदानाचे कार्य करणाºया गोंडवाना विद्यापीठात आदिवासी समाज, कला, संस्कृती व संशोधनाच्या अंगाने वैश्विक नाते जोपासण्याकडे विद्यापीठ स्थापनेच्या आठ वर्षांनंतरही केंद्र व राज्य सरकारने लक्ष दिले नाही. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच विद्यापीठामध्ये आदिवासी साहित्य हा विषय अभ्यासक्रमात शिकविता जातो. अनेक विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक संशोधन करीत आहेत. त्यामुळे गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करावी, याकडे राजगडकर यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले होते. दरम्यान, राज्यपाल विद्यासागर राव यांचे सचिव प्र. पां. लुबाळ यांनी आदिवासी अध्यासन केंद्राविषयी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांना १८ मार्चला दिले आहे.
चंद्रपुरातून स्वाक्षरी मोहिमेची तयारी
महाराष्ट्रातील आदिवासी बोली भाषा व झाडीबोलीसह अन्य भाषांचा तौलनिक अभ्यास करणे, संस्कृती, मानवी व्यवहार, आधुनिकता, आदिवासी विकासाच्या संकल्पना, जगभरातील आदिवासी व भारतातील आदिवासी समुदायांचा अभ्यास, आदिवासी स्थापत्य कला, आयुर्वेद, वैद्यकशास्त्र, आभुषण, काष्ठशिल्प, धातुकला, नृत्यकला, वाद्य, संगीत हे विषय मानवी संस्कृतीच्या प्रगतीची वाटचाल सांगतात. त्यामुळे आदिवासी अध्यासन केंद्रासाठी चंद्रपुरातून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्याची तयारी आदिवासी संघटना करीत आहेत.