अल्पवयीन मुलीला मारहाण; आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 03:51 PM2022-10-19T15:51:55+5:302022-10-19T15:52:50+5:30

आदिवासी संघटना एकवटल्या; कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Adivasi brothers took to the streets over beating a minor girl | अल्पवयीन मुलीला मारहाण; आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर

अल्पवयीन मुलीला मारहाण; आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर

googlenewsNext

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : दसऱ्याच्या दिवशी तालुक्यातील भूज (तु) येथे एकीकडे रावण पूजनाचा कार्यक्रम होता. तर दुसरीकडे रावण दहनाची मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान काहींनी पूजनाच्या स्थळाजवळ फटाके फोडल्याने तणाव निर्माण झाला. यात आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. चुकीचे गुन्हे दाखल करून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. कलमात वाढ करून ३५४ व पोक्सो दाखल करून आरोपींवर योग्य कारवाई करण्यात यावी, याकरिता विविध आदिवासी संघटनांनी मंगळवारी कुर्झा रोडवरील गोटुल ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढला.

जंगलव्याप्त भागात १२०० लोकसंख्या असलेला ब्रम्हपुरीपासून ३५ किमी अंतरावरील भूज येथे दरवर्षी रावण दहन करण्यात येते. तर आदिवासी समाजाकडून पूजनही करण्यात येते. याच कारणावरून दोन गटात वाद निर्माण होतो. वाद होऊ नये म्हणून बैठक घेण्यात आली. पूजनाच्या ठिकाणापासून दोन्ही बाजूला ५० फुटावर फटाके फोडण्यास पाबंदी होती. मात्र, काहींनी जाणीवपूर्वक फटाके फोडल्याने महिलांच्या साड्या जळाल्या.

याच कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. एका अल्पवयीन आदिवासी मुलीला केस ओढून व खाली पाडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप विविध आदिवासी संघटनांनी पत्रपरिषदेत केला. घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली. त्यात विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संशयित आरोपी म्हणून मोरेश्वर मस्के, माणिक थेरकर, प्रकाश लाकडे, हर्षा बोरकर, मंगला बोरकर (सर्व रा. भूज) यांचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींना अटक करावी व उचित कारवाई करावी, अशी मागणी पत्र परिषदेत करण्यात आली होती. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी (दि. १८) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवेदन स्वीकारण्याकरिता अधिकारी आले नाही. त्यामुळे मुख्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारत येत्या पाच - सहा दिवसात पोक्सो व कलम ३५४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक करण्याचे समितीला आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Adivasi brothers took to the streets over beating a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.