आदिवासीबांधव उतरले रस्त्यावर
By admin | Published: December 11, 2015 01:35 AM2015-12-11T01:35:07+5:302015-12-11T01:35:07+5:30
कन्हारगाव-गणपूर-झरण गट ग्रामपंचायतीतील आदिवासी बहुल जनता मागील अनेक वर्षांपासून विकासापासून कोसो दूर आहे. या गावात समस्यांचा डोंगर उभा आहे.
गणपूर, कन्हारगावच्या समस्या सोडवा : झरण येथे रास्ता रोको व मोर्चा
कोठारी : कन्हारगाव-गणपूर-झरण गट ग्रामपंचायतीतील आदिवासी बहुल जनता मागील अनेक वर्षांपासून विकासापासून कोसो दूर आहे. या गावात समस्यांचा डोंगर उभा आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या विविध समस्या या परिसरात असून शासनस्तरावरून समस्या निकाली काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. तर या भागातील ४८ गावातील जनतेला रोजगारापासून वंचित ठेवण्याकरिता कन्हारगाव अभयारण्य घोषीत करण्याचा शासनाचा डाव आहे. या मागण्यांसाठी गुरूवारी धरण येथे मोर्चा व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात शेकडो आदिवासीबांधवांचा सहभाग होता.
शासनाविरूद्ध घोषणा देत एक तास रस्ता रोको करून वाहतूक थांबविण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व साईनाथ कोडापे, राजु जुनघरे, सरपंच मंगला मडावी, उपसरपंच प्रदीप कुळमेथे, विनोद कुळमेथे, पशुराम कुमरे, किसोर मडावी यांनी केले. गोंडपिपरीचे नायब तहसीलदार सुनिल गावंडे, मंडळ निरीक्षक ए. आर. तिराणकर यांना निवेदन दिले. या मोर्चात साईनाथ कोडापे, राजु जुनघरे, मंगला मडावी, हर्षा चांदेकर, प्रदीप कुळमेथे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलन यशस्वीतेसाठी सहदेव कुमरे, शालु आत्राम, सुनंदा कोडापे, मनोज बोरूले, चेतन दुर्गे, साईनाथ गावंडे, सत्यपाल मडावी, गणपती पेंदोर आदींनी सहकार्य केले. आंदोलनात गणपूर, कन्हारगाव झरण येथील नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान कोठारीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, विरूर स्टे.चे ठाणेदार गव्हाणे यांनी कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)
या आहेत प्रमुख मागण्या
झरण-कन्हारगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे, कन्हारगाव अभयारण्य घोषीत न करणे, कन्हारगाव-चिपडा रस्ता खडीकरण करणे, आदिवासींना गावठाण मंजूर करणे, झरण-गणपूर-कन्हारगाव गावे कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रास व कोठारी पोस्टास जोडणे, सामूहीक वनहक्क दावे त्वरीत निकाली काढावे.