मृतदेहासोबत आदिवासींचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:54 AM2018-10-26T00:54:21+5:302018-10-26T00:54:53+5:30

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थी भीमराव गावडे याचा बुधवारी अकस्मात मृत्यू झाला. याची माहिती जिल्ह्यात पसरताच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी करीत प्रशासनाविरोधात आक्रोश मांडला.

Adivasis with dead bodies | मृतदेहासोबत आदिवासींचा ठिय्या

मृतदेहासोबत आदिवासींचा ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णालयासमोर आक्रोश : आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थी भीमराव गावडे याचा बुधवारी अकस्मात मृत्यू झाला. याची माहिती जिल्ह्यात पसरताच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी करीत प्रशासनाविरोधात आक्रोश मांडला. जोपर्यंत शाळेचे संस्थाचालक घटनास्थळी येऊन मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देत नाहीत व दोषींविरुद्ध कारवाईचे निर्देश देत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी आक्रमक भूमिका आदिवासी बांधवांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रभर मृतदेहासोबत आदिवासी बांधवांनी रुग्णालयातच ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
गोंडपिपरीपासून सात किमी अंतरावर श्रीराम अनुदानित आश्रमशाळा असून विविध तालुक्यातील ३६० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. प्रामुख्याने अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुलांची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेऊ, असे पालकांना पटवून देत ते विद्यार्थ्यांना आणतात. परंतु वास्तविकता मात्र वेगळीच असते. भामरागड तालुक्यातील कोटी गावातील दुसऱ्या वर्गात शिकणारा भीमराव लालसू गावडे याला केवळ एका दिवसाच्या तापाने मृत्यूला सामोरे जावे लागले. यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
बुधवारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर विविध भागातून प्रशासनाविरोधात व मृत कुटुंबियांना न्याय देण्याच्या दृष्टीने आदिवासी बांधवांनी रुग्णालयात एकच गर्दी केली. गंभीर प्रकरण असतानादेखील संस्थेचे पदाधिकारी रात्र होऊनही घटनास्थळी उपस्थित झाले नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांनी आक्रमक भूमिका घेत, जोपर्यंत संस्थाचालक घटनास्थळी येत नाही व मृतकाच्या आई-वडिलांना आर्थिक मदत देत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, असा इशारा दिला. ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातच त्यांनी ठिय्या मांडला. रात्र जागून काढली. लोकांची वाढती गर्दी पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासनाने रुग्णालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला.
यावेळी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर, उपाध्यक्ष साईनाथ कोडापे, लालसू नरोटे, दया लाल कन्नाके, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके समितीचे नितेश कुळमेथे, अल्का आत्राम, अश्विन पुसनाके, दीपक पेंदोर आदींची उपस्थिती होती. या प्रकरणाचा अधिक तपास गोंडपिपरीचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

संस्थाचालकाच्या बेजबाबदार धोरणामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे मृत परिवारातील एका सदस्याला नोकरी देण्याची यावी.
-अल्का आत्राम, सभापती, पंचायत समिती पोंभुर्णा

३० तासानंतर आले संस्थाध्यक्ष
तब्बल ३० तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर संस्थाचालक यांनी घटनास्थळी भेट देत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले व या प्रकरणात दोषी असणाºया कर्मचाºयावर कारवाई करू, असे सांगितले. त्यानंतर आदिवासी बांधवांनी आपल्या आंदोलन मागे घेतले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
सामाजिक दायित्वाचा परिचय
मृतकाच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी उपाशी बसलेल्या आदिवासी बांधवांना सामाजिक बांधिलकी जोपासत येथील सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ साखलवार, अशोक मानिक, वैभव रामटेके, शैलेश बैस यांनी भोजन दान देत माणुसकीचे दर्शन दिले.

शासनातर्फे लाखो रुपयांचे अनुदान संस्थेला मिळत असून ते अनुदान शाळेच्या बहुतेक सुविधांवर खर्च न करता संस्थाचालक गिळंकृत करतात. अशा शाळांची चौकशी करून कायमस्वरूपी त्यांची मान्यता रद्द करावी.
- लालसू नरोटी. जिल्हा परिषद सदस्य, भामरागड

Web Title: Adivasis with dead bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.