निधीअभावी अडला निम्न पैनगंगा प्रकल्प
By admin | Published: December 29, 2014 01:09 AM2014-12-29T01:09:43+5:302014-12-29T01:09:43+5:30
शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्प प्रस्तावास मंजुरी दिली.
नांदाफाटा : शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्प प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानंतर प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र वर्ष लोटूनही निधीअभावी या प्रकल्पाचे काम पुढे गेले नाही. यामुळे यवतमाळ, चंद्रपूर तथा तेलंगणा राज्यातील हजारो हेक्टर शेती सिंचनाला मुकली आहे.
या प्रकल्पासाठी साधारणत: १४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु, प्रकल्प पूर्णत्वास न आल्याने आता त्याच कामासाठी शासनाला १५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, झरीजामणी, वणी, पांढरकवडा, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, बल्लारशाह तर तेलंगणातील बेला, जैनत आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल.
आजमितीला कोरपना तालुक्यात एकूण ४५ हजार हेक्टर जमिनीवर शेती केली जाते. यापैकी केवळ चार हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. यातही बोअरवेल, विहीर हेच सिंचनाचे प्रमुख स्त्रोत असून नदीवरुन होणारे सिंचनही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे लक्ष लागून आहे. मात्र, शासनाने या प्रकल्पासाठी निधीच मंजूर न केल्याचे शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी मंजूर करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)