जिल्हा गॅसयुक्त करण्यासाठी प्रशासनाने वाढविली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:25 AM2019-08-07T00:25:45+5:302019-08-07T00:25:59+5:30
जिल्ह्याला गॅसयुक्त करून धूरमुक्त करण्याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले शंभर टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. १५ आॅगस्टला चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के गॅस युक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्याला गॅसयुक्त करून धूरमुक्त करण्याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले शंभर टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. १५ आॅगस्टला चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के गॅस युक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. या कामाकरिता जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागामार्फत युद्धपातळीवर काम सुरू केले असून कामाची गती वाढविली आहे.
ग्राहकांनी गॅस तसेच धान्य मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याचे तसेच नवीन गॅस जोडणीकरिता काही अडचणी असल्यास हॅलो चांदाच्या १५५, ३९८ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाची सुरुवात १५ जुलै २०१९ रोजी केली. सदर अभियान १४ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अभियानाची सुरुवात जिल्ह्यामध्ये केली.
या अभियानाद्वारे सर्व पात्र कुटुंबांना शंभर टक्के शिधापत्रिका वाटप करणे, सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप, सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.
धूरमुक्त जिल्हा संकल्पना राबवण्यासाठी ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही, त्या कुटुंबातील महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विस्तारित २ मधून केवायसी फार्म मध्ये १४ निकषांवर आधारित असलेले हमीपत्र भरून द्यायचे आहे. याच सोबत रेशन कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड मधील १८ वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्डची झेरॉक्स, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, लगतच्या गॅस एजन्सीकडे किंवा केरोसीन व रास्तभाव दुकानदाराकडे तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचा आवाहन प्रशासनाने केले आहे.
कागदपत्रांची छाननी पूर्ण होताच १०० रुपयात गॅस कनेक्शन मिळणार आहे. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशांनी तात्काळ तहसील कार्यालयात संपर्क करावा. तसेच ज्यांचे आधार कार्ड नसेल किंवा आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तात्काळ जवळच्या कॉमन सर्विस सेंटर किंवा बँकेत संपर्क साधण्याची विनंतीही करण्यात आली आहे. नागरिकांनी दखल घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. शिधापत्रिका व गॅस जोडणी संदर्भात मागणी अथवा चौकशीसाठी हॅलो चांदा १५५, ३९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.