प्रशासनाने चिमूर घोडा रथ यात्रेस परवानगी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:29 AM2021-01-25T04:29:43+5:302021-01-25T04:29:43+5:30
चिमूर :३९४ वर्षाच्या इतिहासाची परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचा तिरुपती बालाजी म्हटले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत ...
चिमूर :३९४ वर्षाच्या इतिहासाची परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचा तिरुपती बालाजी म्हटले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान ठरले आहे तर विदर्भातील भाविकासाठी चिमूरची घोडा रथ यात्रा श्रद्धेसह आकर्षण आहे. ही यात्रा सलग १५ दिवस चालत असून येत्या १६ फेब्रुवारी वसंतपंचमी ते २९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत यात्रा चालणार होती. यात्रेसाठी विदर्भातील लाखो भाविक हजेरी लावून दर्शन घेतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घोडा रथ यात्रेस परवानगी नाकारल्याने यात्रेची ३९४ वर्षाची परंपरा खंडित होणार आहे.
महाराष्ट्राचे तिरुपती या नावाने प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे श्रीहरी बालाजी देवस्थान, या प्रसिद्ध मंदिरात दरवर्षी मिनी माघ शुद्ध पंचमीला नवरात्र प्रारंभ होते. मिनी माघ त्रयोदशीला रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत भव्य लाकडी घोड्यावरून श्रीहरी बालाजी महाराजाच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणूकीला रात घोडा असे संबोधण्यात येते. या रात घोड्याला पंचक्रोशीतील लाखो भाविक हजेरी लावून बालाजी महाराजांचे दर्शन घेतात तर तिसऱ्या दिवशी दुपारी १२ ते ३ वाजता गोपालकाला करून मुख्य यात्रेची समाप्ती करण्यात येते. चिमूरची घोडा रथ यात्रा सलग १५ दिवस चालते व महाशिवरात्रीला यात्रेची सांगता करण्यात येते.
चिमूरची घोडा रथ यात्रा विदर्भातील भाविकांचे आकर्षण ठरणारी असली तरी यात्रा भरविण्यासंदर्भात श्रीहरी बालाजी देवस्थानचे ट्रस्टी निलम जनार्धन राचलवार यांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना पत्राव्दारे मार्गदर्शन मागविले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा भरविण्यास मनाई केली आहे.