शिक्षकांच्या वेतनाप्रती प्रशासन उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:26 AM2021-03-08T04:26:13+5:302021-03-08T04:26:13+5:30
चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन अनियमित व उशिराने होत आहे. यासाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी असा ठराव ...
चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन अनियमित व उशिराने होत आहे. यासाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी असा ठराव महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हा सभेत घेण्यात आला.
पुरोगामी शिक्षक संघटनेची त्रैमासिक सभा जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राज्य नेते विजय भोगेकर,राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्याध्यक्ष अल्का ठाकरे व सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस यांची उपस्थिती होती. सभेत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा झाली. यात मासिक वेतन हे कधीच एक तारखेला होत नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाचे वेळकाढू व निष्काळजीपणाचे धोरण कारणीभूत आहे, असे मत सर्वांनी व्यक्त केले. यासह प्रलंबित समस्यांमध्ये प्राथमिक शिक्षकांची निवड श्रेणी, त्रुटीमध्ये अडकलेली प्राथमिकची वरिष्ठ श्रेणी, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख वरिष्ठ श्रेणी, सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक गट विमा प्रकरणे, आजारी रजा प्रकरणे, प्रलंबित वेतन पडताळणी सेवापुस्तके, स्थायी आदेश, हिंदी मराठी व संगणक सूट, शैक्षणिक अर्हता परवानगी, डीसीपीएस धारकांच्या हिशेबासह पावत्या देणे, प्रलंबित तालुक्यातील जीपीएफ पावत्या, उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती, अतिरिक्त प्रभार मेहनताना, जिल्हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम घेणे, संघटना सभेचे नियमित आयोजन व कार्यपूर्ती अहवाल देणे वैयक्तिक समस्या सोडविणे, विद्यार्थी गणवेश बाबत मार्गदर्शन, शाळाबाह्य व अन्य सर्व्हे, शाळाबाह्य कामे शिक्षकांना देऊ नये, विना कोविड चाचणी व लसीकरण कोणीही शाळेला भेटी देऊ नये आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. समस्या सोडविण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे मत नारायण कांबळे, रवी सोयाम, दीपक वरहेकर, निखिल तांबोळी, लोमेश येलमले, दुष्यंत मत्ते, आकाश झाडे, राजू चौधरी, विद्या खटी, लता मडावी यांनी केले. यावेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी रणजित तेलकापल्लीवार, संदीप कोंडेकर, मनोज बेले, जगदीश ठाकरे, गंगाधर बोढे, नरेंद्र डेंगे, दिलीप मडावी, रफिक शेख, किसन अलाम, देवेंद्र गिरडकर, प्रणिता नंदूरकर, वैशाली वडेट्टीवार उपस्थित होते.