प्रशासकांच्या हाती जि.प.चा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 05:00 AM2022-03-21T05:00:00+5:302022-03-21T05:00:35+5:30
राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहित मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५ मधील कसलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार आता प्रशासकांच्या हातात गेला आहे. दरम्यान, विविध बिल, कामे करून घेण्यासाठी मागील काही दिवसांत जिल्हा परिषद परिसरात पदाधिकारी, सदस्यांची सारखी वर्दळ बघायला मिळाली. विशेष म्हणजे निवडणूक होईपर्यंत, म्हणजे पुढील किमान सहा महिने प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषदेचा कारभार चालविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहित मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५ मधील कसलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचे ३३, तर काँग्रेस २० सदस्य निवडून आले होते. त्यामुळे भाजपची एकहाती सत्ता होती. अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्या संध्या गुरुनुले विराजमान होत्या. निवडणुकीसाठी बराच कालावधी असल्यामुळे इच्छुकांना तयारीसाठी वेळ मिळणार आहे. विशेष म्हणजे, गावागावात गाठीभेटीला मात्र वेग आला आहे.
सतत पाचवेळा निवडून येण्याचा पराक्रम
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले या मूल तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्रातून सतत पाच वेळा निवडून आल्या आहेत. १९९९ मध्ये त्यांच्याकडे महिला व बालकल्याण समिती सभापतिपद होते. त्यानंतर १४-१५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले. दरम्यान, मागील अडीच वर्षांपासून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आहे. दीर्घ अनुभवामुळे त्यांची प्रशासनावर चांगलीच पकड होती.
२२ वर्षांनंतर ते झाले माजी
प्रथम सात वर्षे ग्रामपंचायत सदस्य आणि त्यानंतर तीन पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेवर निवडून आलेले काँग्रेसचे डाॅ. सतीश वारजुकर हे तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रविवारपासून माजी सदस्य झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले आहे.