३६ योजना घेऊन कोलाम बांधवांच्या दारात पोहोचणार प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:26+5:302021-09-24T04:32:26+5:30
साईनाथ कुचनकार चंद्रपूर : शासनाच्या विविध योजना असतानाही कोलाम बांधवांना आजही पाहिजे त्या प्रमाणात लाभ मिळाला नाही. परिणामी, समाजप्रवाहापासून ...
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : शासनाच्या विविध योजना असतानाही कोलाम बांधवांना आजही पाहिजे त्या प्रमाणात लाभ मिळाला नाही. परिणामी, समाजप्रवाहापासून ते खूप दूर आहे. या बांधवांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती तसेच योजनांचा लाभ व्हावा, यासाठी राज्य तसेच केंद्र शासनाच्या असलेल्या विविध ३६ योजना घेऊन प्रशासन कोलाम बांधवांच्या दारापर्यंत पोहोचणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, २ ऑक्टोबरपासून कोलाम विकास पंधरवड्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विशेषत: चंद्रपूर विभागात राजुरा, कोरपना, जिवती तसेच चिमूर विभागात वरोरा तालुक्यामध्ये २ हजार १५ कोलाम बांधवांचे कुटुंब पाडे तसेच वस्त्यांमध्ये वास्तव्यास आहे; मात्र आजही ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. केंद्र तसेच राज्य शासनाकडून विविध योजना आहे; मात्र या योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही. काही योजनांची माहिती त्यांना असली तरी आवश्यक असलेले कागदपत्र त्यांच्याकडे नसल्याने या योजनांचा लाभ त्यांना मिळतच नसल्याचे वास्तव आहे. आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनामध्ये येथील सहायक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रोहण घुगे यांनी कोलाम बांधवांच्या उत्थानासाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी प्रथम प्रत्येक कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले असून, त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. यानंतर आता प्रत्येक विभागनिहाय यंत्रणांना काम वाटून त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अनेकांकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्याचे त्यांच्या लक्षात आले असून, प्रमाणपत्र काढून देण्यासाठी प्रत्येक पाड्यामध्ये शिबिरही लावण्यात येणार आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात एकूण कुटुंब चंद्रपूर विभाग-१७२४
चिमूर विभाग-२९१
बाॅक्स
केंद्र तथा राज्य शासन योजना -३६
जिल्ह्यात ७० पाडे
बाॅक्स
या तालुक्यात सर्वांधिक संख्या
१. कोरपना
२. राजुरा
३. जिवती
४.वरोरा
बाक्स
२२ पॅरामीटरनुसार लाभ
कोलाम बांधवांना समाज प्रवाहात आणण्यासाठी एकात्मिक आदिवासी विभागाद्वारे २२ पॅरामीटरनुसार काम करण्यात येणार आहे. यामध्ये पाणी, रस्ता, नाल्या, वीज, शिक्षण, आरोग्य, वाचनालय, सभागृह, प्रशिक्षणासह इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधाही पुरविण्यात येणार आहे.
बाॅख्स
कोलाम विकास पंधरवडा पाडणार
कोलाम बांधवांना योजनांचा लाभ मिळावा, त्यांना योजनांची माहिती व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन २ ऑक्टोबरपासून कोलाम विकास पंधरवडा राबविणार आहे. या पंधरवड्यामध्ये त्यांच्या समस्या तसेच विकास यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत.
कोट
केंद्र तसेच राज्य शासनाच्या कोलाम बांधवांसाठी विविध योजना आहेत. या प्रत्येक योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मिशन कोलाम विकास’ हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत त्यांना माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यासाठी विविध विभागातील यंत्रणांना काम सोपविण्यात येणार आहे.
- रोहण घुगे
सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर.