अवैध रेतीसाठ्यावर प्रशासनाची करडी नजर, तीन पथकांचे गठन
By साईनाथ कुचनकार | Published: April 12, 2023 11:54 PM2023-04-12T23:54:16+5:302023-04-12T23:55:38+5:30
पोलिसांची मदत : कारवाई करण्याचेही दिले टार्गेट
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध खनन, साठवणूक तसेच वाहतूक केली जात आहे. यासंदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले असून त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांचे कान टोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी रेती तस्करांवर कारवाई करणे सुरू केले आहे. दरम्यान, तहसीलस्तरावर विविध पथकांचे गठन केल्या जात आहे. चंद्रपूर तालुक्यातीत रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी तीन पथकांचे गठण करण्यात आले आहे. हे पथक लक्ष ठेवून राहणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक महिन्याला कारवाईचे त्यांना टार्गेटही देण्यात आले आहे.
औद्योगिक जिल्हा तसेच मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात असल्याने रेतीची मोठी मागणी आहे. त्यामुळे रेती तस्कर लपून-छपून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करीत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून पर्यावरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी रेती तस्करांवर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उचित कारवाई करीत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तालुका प्रशासनांनी रेती तस्करी रोखण्यासाठी पथकांचे गठन केले आहे.
बाॅक्स
चंद्रपुरात या पथकांमध्ये समावेश पथक एक
पथक प्रमुख जितेंद्र गादेवार नायब तहसीलदार (प्रभारी तहसीलदार), पोलिस उपनिरीक्षक, पोलिस स्टेशन रामनगर, बिट जमादार संबंधित विभाग, मंडळ अधिकारी, चंद्रपूर सर्कल, यांच्यासह बोर्डा, पिंपळखुट, जुनोना, चांदा रे. दुर्गापूर येथील तलाठी, संबंधित क्षेत्राचे कोतवार.
पथक २
पथक प्रमुख राजू धांडे, नायब तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन पडोली, बिट जमादार संबंधित विभाग, मंडळ अधिकारी पडोली, यांच्यासह ताडाळी, मोरवा, पडोली, पदमापूर येथील तलाठी, तसेच कोतवाल.
पथक ३
पथक प्रमुख सचिन खंडाळे, नायब तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन घुग्घुस, बिट जमादार, मंडळ अधिकारी घुग्घुस सर्कल यांच्यासह घुग्घुस, नागाळा, पिंपरी येथील तलाठी तसेच संबंधित क्षेत्राचे कोतवाल.