क्रांतिभूमीच्या मातीने दिला प्रशासकीय अधिकारी
By Admin | Published: July 8, 2015 01:21 AM2015-07-08T01:21:55+5:302015-07-08T01:21:55+5:30
चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताच्या तपोभूमीच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा (पेठ) या लहानशा गावातील एका विद्यार्थ्यांने मोठे यश संपादन केले आहे.
मुक्त विद्यापीठाची पदवी ठरली पाया : केवाडा (पो.) देशाच्या पटलावर
राजकुमार चुनारकर खडसंगी
चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताच्या तपोभूमीच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा (पेठ) या लहानशा गावातील एका विद्यार्थ्यांने मोठे यश संपादन केले आहे. या क्रांतीभूमीने देशाला एक प्रशासकीय अधिकारी दिल्याने चिमूरचे नाव आणखी एकदा देशाच्या पटलावर आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांतीचे नाव आजही अजरामर आहे. याच तालुक्यातील केवाडा (पेठ) या १७३७ लोकसंख्येच्या गावात बालपण गेलेल्या संदीप गोपालदास मोहुर्ले याने युपीएससी परीक्षेत ७३० वा मेरीट येऊन गावाचे नाव देशाच्या पलाटावर आणले आहे. संदीप हा भंडारा जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र त्याने शिक्षकी पेशावरच समाधान न मानता मोठा अधिकारी बनण्याचा चंग बांधला. याकरिता संदीपने मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले व आयएएस परीक्षेच्या दृष्टीने शिक्षकी पेशा सांभाळून परिश्रमास सुरूवात केली. त्याला पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये संदीपने केंद्र शासनाच्या युपीएससी परीक्षेत (७३०) वा मेरीट येऊन प्रशासकीय सेवेत मोठे यश संपादन केले आहे. राष्ट्रसंताची तपोभूमी असलेल्या गोदेडाच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा या लहानशा गावात राहणाऱ्या लक्ष्मण रामजी मोहुर्ले यांना गोपालदास व पटवारी असे दोन अपत्य. त्यापैकी संदीपचे वडील गोपालदास यांना शासकीय नोकरीकरीता गाव सोडावे लागले व ते नोकरीकरिता गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे स्थायीक झालेत.
संदीप मोहुर्ले यांचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे झाले. त्यानंतर वडसा व गडचिरोली येथून डी.एड. पर्यंत शिक्षण घेतले. डीएडनंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यात शिक्षकी पेक्षा स्वीकारला. आज घडीला संदीप लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत.
प्रस्तुत प्रतिनिधीने संदीपची भेट घेऊन विचारणा केली असता, त्याने सांगितले माझे शिक्षण आदिवाही बहुल जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात झाले. बाबाच्या नोकरीनिमित्त आम्ही बाहेर गेलो असलो तरी बाबाचे जन्मगाव चिमूर तालुक्यातील केवाडा असल्याने या गावाशी माझे नाते आहे. त्यामुळे केवाडा गावाविषयी मला आपुलकी आहे.
आजही बाबाची शेती केवाडा येथे असून माझे काका पटवारी मोहुर्ले राहतात. त्यामुळे मी या गावात जात असतो. तेव्हा या गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द असल्याचेही सांगितले. तर गाव खेड्यात सामाजिक समता प्रस्तावित करुन शांतात टिकवण्यासाठी प्रयत्न करून गावखेड्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही संदीपने ‘लोकमत’ला सांगितले.