नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासकीय धिंडवडे
By admin | Published: May 13, 2014 11:22 PM2014-05-13T23:22:12+5:302014-05-13T23:22:12+5:30
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते.
रवी जवळे - चंद्रपूर सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला जातो. मात्र जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात या योजना फाईलीत गुंडाळून नागरिकांना आजारांच्या खाईत लोटण्याचे संतापजनक प्रकार होत आहे. डेंग्यू, मलेरियाच्या डासांना हद्दपार करणार्या फॉगींग मशीन्सबाबत जिल्हा परिषदेने हाच कित्ता गिरवला आहे. जिल्हाभर पुरविलेल्या २७७ फॉगींग मशीन्सपैकी तब्बल २३२ मशीन्स बंद असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाला साधा डास चावल्याची जाणीव होऊ नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. मुंबईच्या मंत्रालयातून येणार्या विविध विभागातील योजना या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे युध्दस्तरीय काम होत असते. मात्र अलिकडे हे मिनी मंत्रालय डस्टबीनसारखेच काम करीत असल्याचे दिसून येत आहे. आल्या योजना की गुंडाळल्या फाईलीत, असेच समीकरण सुरू आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे वृत्त जिल्ह्यातील अनेक गावांमधून येत आहे. मागील एक महिन्यात दहाहून अधिक जणांचा बळी गेला आहे. काही जणांचे मृत्यू तापामुळे झाले असले तरी ते समोर येऊ शकले नाही. साथीचे आजार पसरल्याची तक्रार आली की जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग केवळ शिबिर लावून हात मोकळे करतात, असा अनुभव आहे. डासांचा नाईनाट करणार्या फॉगींग मशीन्सचा पुरवठा शासनाने गावागावांमध्ये केला. केवळ मशीन्स पुरवून प्रशासन गप्प बसले. प्रत्यक्षात या मशीन्स धूळखात पडून आहे. जिल्हाभरात २७७ फॉगींग मशीन्स देण्यात आल्या आहेत. यात केवळ ४५ फागींग मशीन्स सुरू आहेत तर तब्बल २३२ मशीन्स दिल्यापासून बंद अवस्थेत आहे. मागील तीन वर्षांंपासून हीच स्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन स्वस्थ बसले आहे. नागरिकांचे स्वास्थ मात्र बिघडत आहे. केवळ कागदोपत्री या मशीन्स वाटून प्रशासन धन्यता मानत असली तरी दुसरीकडे डासांनी आपले काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोळ्यादेखत नागरिकांचे बळी जात आहे. सद्यस्थितीत घुग्घुस, उर्जानगर, दुर्गापूर, नकोडा, ताडाळी, पडोली, नागाळा, आंबोरा, जुनोना, बोर्डा, पायली भटाळी, पद्मापूर, मोरवा, कोसारा, चिचपल्ली, बेंबाळ, डोंगरगाव, चिंचाळा, सावली, अंतरगाव, घोडेवाही, पाथरी, चिचबोडी, व्याहाड बु., चांदाबुज, गायडोंगरी, मोखाळा, निलसनी पेठगाव, सोनापूर, पळसगाव जाट, पेठगाव, देलनवाडी, लोणवाही, अंतरगाव, नवखळा, नांदेड, वाढोणा, परडी ठवरे, कोजबीमाल, गोविंदपूर, विहिरगाव, सावरगाव, आलेवाही, ढोरपा, तळोधी बा., मिंडाळा, मौशी, कन्हाळगाव, किटाळी बो., कान्पा, मिंथूर, चिंधीचक, बाळापूर, मेंडकी, गांगलवाडी, मुडझा, बरडकिन्ही, हळदा, अर्हेर नवरगाव, पिंपळगाव, चौगाण, जुगनाळा, खेडमक्ता, मालडोंगरी, उदापूर, तुलनमेंढा, बोरगाव, चिखलगाव, नान्होरी, खरकाडा, बेटाळा, रामपुरी, तळोधी, बेलगाव जाणी, रई, भुज, आवळगाव, घोडपेठ, चालबर्डी, घोनाड, चेक तिरवंजा, माजरी, नंदोरी, देऊळवाडा, कोंढा, पाटाळा, डोंगरगाव, धानोली, पिर्ली, विलोडा, चंदनखेडा, बेलगाव, वायगाव, सागरा, शेगाव खु., मुधोली, आष्टा, भामडेळी, शेगाव, माढेळी, नागरी, टेमुर्डा, सालोरी, आबामक्ता, वायगाव, बोर्डा, सुमठाणा, सोईट, पाचगाव, आनंदवन, चिकणी, वंधली, जळका, मोखाळा, खांबाडा, चरूरखटी, खेमजई, भटाळा, बोरगाव, डोंगरगाव, खरवडा यासह तब्बल २३२ गावांमध्ये फॉगींग मशीन्स बंद आहेत.