पंधराही पंचायत समितींवर आजपासून प्रशासकराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 05:00 AM2022-03-14T05:00:00+5:302022-03-14T05:00:39+5:30
राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५) ५ मधील कलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २१ मार्चपर्यंत तर पंचायत समितीचा १३ मार्चपासून कार्यकाळ संपल्याने दोन्ही संस्थावर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंधराही पंचायत समितींचा कारभार आजपासून प्रशासक सांभाळणार आहे. दरम्यान,सभापतींच्या ताब्यातील वाहने जमा करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा ५) ५ मधील कलम ९१ ब आणि ७५ ब या कलमानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
निवडणुकीतून पदे भरली जातील तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज सांभाळणार आहे. तर पंचायत समितीतही गटविकास अधिकारी कारभार सांभाळणार आहे. सध्यास्थितीत चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. तर आठ पंचायत समितीवर भाजप आणि ७ वर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीनंतर ही सत्ता नेमकी कुणाकडे जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे निवडणूक लांबणीवर गेली असली तरी राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे.
पदाधिकारी निवडी पर्यंत अधिकारी
जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे,त्याचप्रमाणे पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेशात म्हटले आहे. ही नियुक्ती चार महिन्यांपर्यंत किंवा जि. प. अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीचे सभापती, उपसभापतींची पदे निवडणुकीद्वारे भरले जातील,यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत प्राधिकृत अधिकारी राहतील असे आदेश आहे.
८ पं. स. वर भाजप ७ वर काँग्रेसची सत्ता
चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा पंचायत समितींमध्ये आठ पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व आहे. तर उर्वरित पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. दरम्यान,वरोरा येथे राजकीय उलथापाथलीमध्ये काँग्रेसकडे तर सावलीमध्ये टाॅस झाल्यानंतर काँग्रेसकडे सत्ता गेली.