महारोजगार मेळावा राज्यात आदर्श ठरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:26 AM2018-10-22T00:26:18+5:302018-10-22T00:27:27+5:30
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २८ आणि २९ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २८ आणि २९ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण्यात आले आहे. आॅनलाइन निवड प्रक्रिया आणि आॅनलाईन रजिस्ट्रेशन या माध्यमातून पारदर्शी निवड प्रक्रीयेचा आदर्श या मेळाव्यातून उभा राहिला पाहिजे. बल्लारपूरचा महारोजगार मेळावा हा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरावा, अशा पद्धतीचे काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.
महारोजगार मेळाव्यासंदर्भातील वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला असून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी यावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. यासोबतच जिल्हाभरात युवकांना आवाहन करणाऱ्या चित्ररथाची सुरुवातदेखील शनिवारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मोठ्या उद्योग समूहांनी या मेळाव्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात. त्यांच्याकडे लागणाºया कर्मचाºयांसोबतच त्यांना लागणाºया सोयीसुविधा देखील जिल्ह्यातीलच वापरण्यात याव्यात, यासाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील मोठे उद्योग समूह, महाऔष्णिक विद्युत केंद्र, कौशल्य विकास रोजगार निर्मिती विभाग, उद्योग विभाग, कृषी विभाग, वनविभाग, पर्यटन विभाग व अन्य सर्व विभागांनी आपापले स्टॉल या ठिकाणी लावावे, यासाठीच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्यात.
या बैठकीला फॉर्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभापती राहुल पावडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा संदेश असलेला चित्ररथ जिल्हाभरात रवाना करण्यात आला.
आॅनलाईन नोंदणी आवश्यक
महाराष्ट्रात मुद्रा बँकेंंतर्गत अधिकतम कर्ज चंद्रपूर जिल्ह्यात वाटप करण्याबाबतचे बँकांनी उद्दिष्ट घेऊनच या मेळाव्यामध्ये आपली नोंद करावी. मार्गदर्शन, प्रशिक्षण, कार्यशाळा, मुद्रा कर्ज उपलब्धता, याशिवाय ५० प्रतिष्ठित कंपन्यांकडून शेकडो युवकांची निवड या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्यात सहभागासाठी आॅनलाईन नोंदणी आवश्यक आहे, असे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
सहा सूत्री संधीची उपलब्धता
चंद्रपूर जिल्हा रोजगारयुक्त बनविण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन उन्नत शेती, मिशन सोशल वर्क हा सहा सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. युथ एम्पॉवरमेंट समीट हा या सहा सुत्री कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे. इयत्ता दहावीपासून पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रीकी, आय.टी.आय. अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्हयातील तरूण-तरूणी या मेळाव्यात सहभागी होवू शकतील.
प्रख्यात कंपन्या येणार
यावेळी नागपूर येथील फॉर्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी सांगितले की आॅनलाइन रजिस्ट्रेशन आणि प्रख्यात कंपन्यांना गुणवान मुलांची उपलब्धता करणे, त्यांना बल्लारपूरच्या आयोजन स्थळावर पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणेने काम करावे. अतिशय पारदर्शी अशी निवड प्रक्रिया या ठिकाणी मुलांसमोरच केली जाणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रख्यात कंपन्या चंद्रपूरसारख्या ठिकाणी येत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.