चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिने दत्तक घेतलेली गावे वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:24 AM2017-12-08T11:24:11+5:302017-12-08T11:24:55+5:30
द्रावती तालुक्यातील माजरी क्षेत्रात चारगाव, तेलवासा, ढोरवासा, कुनाडा या खुल्या कोळसा खाणी आहेत. याच परिसरात ढोरवासा, कुनाडा ही गावे वसली आहेत. वेकोलि उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियमबाह्य ब्लॉस्टिंग करीत असल्याने अनेक घरांना भेगा पडल्या आहेत.
विनायक येसेकर।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील माजरी क्षेत्रात चारगाव, तेलवासा, ढोरवासा, कुनाडा या खुल्या कोळसा खाणी आहेत. याच परिसरात ढोरवासा, कुनाडा ही गावे वसली आहेत. वेकोलि उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियमबाह्य ब्लॉस्टिंग करीत असल्याने अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. तर, काही घरे कोसळण्याच्या स्थितीत आहे. दत्तक घेतलेल्या गावांत मूलभूत सुविधांचा अभाव असून सामाजिक उत्तरदायित्त्वाचा निधीही वेकोलिकडून खर्च केला जात नाही.
वेकोलिच्या नियमानुसार कोळसा खाणीचे उत्खनन संबंधित गावापासून ५०० मीटर अंतरावर असायला पाहिजे. परंतु, नियम बाजूला सारून तेलवासा व चारगाव या गावांपासून केवळ १०० मीटर अंतरावरच उत्खनन सुरू केले. सतत होणाऱ्या ब्लॉस्टिंगमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. या गावातील बहुतांश घरांना भेगा पडल्याचे दिसून येते. वेकोलिने रात्रीच्या सुमारास ब्लॉस्टिंग करू नये, अशी मागणी चारगाव, तेलवासा गटग्रामपंचायतीचे सरपंच चंदा रूपेश वासाडे यांनी केली होती. काही दिवस ब्लॉस्टिंग बंद होते. दरम्यान, तेलवासा गावातील घरांवर मोठे दगड पडल्याने गावकऱ्यांचे नुकसान झाले. या घटनेचा विरोध म्हणून महिलांनी तेलवासा खाण गाठून वेकोलि अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, या अधिकाऱ्यांनी महिलांविरुद्ध पोलिसात तक्रार करून गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. वेकोलिच्या सतत होणाऱ्या त्रासापोटी चारगाव व तेलवासा गावकऱ्यांनी पूनर्वसनाचा मुद्दा रेटून धरला आहे. पण, प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तीन वर्षांपूूर्र्वी चारगाव येथील मेघा विजय धानकी विद्यार्थिनीचा भिंत कोसळून मृत्यू झाला होता.
विद्यार्थी बसतात जीर्ण शाळेत
माजरी परिसरातील चारगाव, तेलवासा, कुनाडा आणि ढोरवासा खुली कोळसा खाण सुरू होऊनही पूनर्वसन व घरांचा प्रश्न सुटला नाही. कुनाडा गावाचे वेकोलिने तीनदा पूनर्वसन केले. हे गाव आता भद्रावतीच्या शेजारी वसले आहे. तत्कालीन सरपंच शोभा पारखी यांच्या नेतृत्वात सतत पाठपुरावा केल्याने हे शक्य होऊ शकले. परंतु, १० वर्षांचा काळ लोटूनही वेकोलिने दत्तक घेतलेल्या चारगाव, तेलवासा, कुनाडा, ढोरवासा, देऊरवाडा गावांची स्थिती बदलली नाही. चारगाव व कुनाडा येथील जिल्हा परिषद शाळा जीर्ण झाली. दत्तक घेतलेल्या गावातील विद्यार्थी जीव मूठीत घेवून वर्गात बसत आहेत.
वसाहतीलाही पडल्या भेगा
एकतानगर वसाहतमध्ये वेकोलिचे कामगार तसेच अधिकारी राहतात. या वसाहतीला २० वर्षे झाले. बहुतांश घरांना भेगा पडल्या आहेत. रुग्णालयातही डॉक्टर नाही. प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासोबतच भरपाई द्यावी, अशी मागणी राजू गैनवार यांनी केली. ढोरवासा-तेलवासा ही खाण बंद होण्याच्या अवस्थेत आहे. या खाणीजवळ वर्धा नदी असल्याने १५० मीटर अंतरानंतर कोळसा काढता येत नाही. कुनाडा खाणीमध्ये अपघात झाल्याने बंद आहे. त्यामुळे कामगारांना रोजगार देण्यासाठी माजरी क्षेत्रातील कोंढा-हरदोना ही प्रस्तावित खाण वेकोलिने सुरू करावी, अशी मागणी माजरी इंटक क्षेत्राचे महासचिव धनंजय गुंडावार यांनी केली आहे.
प्रदुषणामुळे नापिकीचे संकट
तेलवासा, चारगाव या गावाशेजारून वेकोलिचा मुख्य मार्ग माजरीकडे जातो. या मार्गाने मोठ्या कोळशाची वाहतूक होते. परिणामी धुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. चारगाव येथील गुणवंत काशिनाथ चटकी यांच्या तीन एकराच्या शेतात वेकोलिने मातीचे ढिगारे उभारले आहे. सूर्यभान चटकी, नागो टेकाम, सुरेश गोवारदिपे, रामदास मडावी, श्यामराव मडावी यांच्या शेतातून वेकोलिने खाणीतील पाणी बाहेर काढण्यासाठी नाल्याचे बांधकाम केले. पण, उपयोग झाला नाही. देऊरवाडा येथील मंगलदास देरकर, पुरुषोत्तम चौधरी यांच्या शेतीवर वेकोलिने ओव्हरबर्डन टकाल्याने सुपीक माती खाली गेली. पीक घेणे बंद झाले. मातीच्या ढिगाऱ्यामुळे सभोवतालची शेती प्रदूषित झाली, अशी व्यथा प्रभाकर वासाडे, अन्नाजी सातपुते, रूपेश वासाडे, नामदेव आसेकर, उमेश शिवरकर, राजू खिरटकर, वामन आसुटकर, प्रभाकर सातपुते यांनी व्यक्त केली.