चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन

By साईनाथ कुचनकार | Published: November 3, 2023 01:46 PM2023-11-03T13:46:56+5:302023-11-03T13:56:55+5:30

देशाचा सन्मान : लंडनमधील शैक्षणिक स्वयंसेवेची जागतिक दखल

Adv Deepak Chatap of Chandrapur Honored with the Chevening Gold Volunteering Awarded by the Foreign Commonwealth Development Department of the British Government | चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन

चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन

चंद्रपूर : युनायटेड किंग्डम येथे जगभरातून उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणांना शिक्षणासह ज्यांच्या कामाचा सामाजिक प्रभाव तेथील सरकारवर पडतो, त्यांना ब्रिटिश सरकारच्या फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट विभागाकडून गौरवण्यात येते. यावर्षी जगभरातील १६८ देशातील १ हजार ६०० स्कॉलर्समधून चंद्रपूरचा दीपक ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड'मॅन ठरला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेणाऱ्या ॲड. दीपक यादवराव चटप या केवळ २६ वर्षीय भारतीय तरुण वकिलाला आंतरराष्ट्रीय संस्थांतील सामाजिक योगदानासाठी चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनमधील आंतरराष्ट्रीय संस्थांतील प्रभावशाली शैक्षणिक स्वयंसेवा योगदानाची जागतिक स्तरावर दखल झाल्याने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

ॲड. दीपक चटप यांनी लंडनमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान सामाजिक न्याय, शांतता आणि मानवी हक्कांसाठी समर्पित आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी स्वेच्छेने सुमारे १६२ तास काम केले. ब्रिटन सरकारच्या फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट विभागातर्फे वर्षभर स्वयंसेवेसाठी असाधारण बांधिलकी दाखविणाऱ्या जगभरातील स्कॉलर्सतून हा पुरस्कार दिला जातो. नुकताच त्यांना हा सन्मान लंडन येथे प्रदान करण्यात आला.

ॲड. दीपक चटप यांना गेल्या वर्षी ब्रिटिश सरकारतर्फे प्रतिष्ठेची 'चेव्हनिंग' शिष्यवृत्ती दिली होती. ज्यामुळे त्यांना लंडनमधील सोएस या जागतिक नामांकित विद्यापीठात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेता आले. या संधीचे सोने करत दीपकने जगभरातील स्कॉलर्समधून आपली छाप सोडली. लंडन येथे उच्च शिक्षणानंतर समाजहितासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात परत येऊन येथे सामाजिक काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

जागतिक परिषदेतही ॲड. चटप यांचा सहभाग

वर्षभरात युनायटेड किंग्डम येथील ग्लासगो, बर्मींगम, कार्डीफ आदी ठिकाणी झालेल्या जागतिक परिषदेतील ॲड. दीपक चटप यांचा सहभाग महत्वपूर्ण ठरला. विशेषतः लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या जागतिक परिषदेत विशेष वक्ता म्हणून ॲड. दीपकने भूमिका मांडली. जगभरातील स्कॉलर्सचे नेतृत्व करत लंडनच्या संसदेत लोकप्रतिनिधी - स्कॉलर्स संवाद घडवून आणला. लंडनमध्ये भारतीय लोकशाही व आजची आव्हाने यावर परिसंवाद घडवून आणत जगभरातील स्कॉलर्सचे भारताविषयी लक्ष वेधले.

Web Title: Adv Deepak Chatap of Chandrapur Honored with the Chevening Gold Volunteering Awarded by the Foreign Commonwealth Development Department of the British Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.