अड्याळ टेकडी हे ग्रामसभेचे केंद्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:20 AM2017-12-18T00:20:23+5:302017-12-18T00:20:42+5:30
ग्रामसभेचे अड्याळ टेकडी हे केंद्रस्थान आहे. देशात कोठेही नाही पण अड्याळ टेकडीवरच ग्राम स्वराज्याचे प्रयोग झाले, असे प्रतिपादन दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग मुनी यांनी अड्याळ टेकडी येथे केले.
आॅनलाईन लोकमत
अड्याळ टेकडी : ग्रामसभेचे अड्याळ टेकडी हे केंद्रस्थान आहे. देशात कोठेही नाही पण अड्याळ टेकडीवरच ग्राम स्वराज्याचे प्रयोग झाले, असे प्रतिपादन दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग मुनी यांनी अड्याळ टेकडी येथे केले.
अड्याळ टेकडीवर नुकतेच दोन दिवशीय आंतरराज्यीय ग्रामसंसद अभियान पार पडले. यावेळी ते बोलत होते. या ग्रामसंसद अभियानात आंध्रप्रदेश तेलंगणा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, बेंगुलोर, बिहार, महाराष्ट्र व दिल्ली येथून जवळजवळ ३०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. या ग्रामसंसद अभियानाच्या अध्यक्षस्थानी अड्याळ टेकडीचे प्रमुख लक्ष्मणदादा नारखेडे हे होते.
यावेळी बजरंग मुनी पुढे म्हणाले, ग्रामसभा जर मजबुत करायची असेल तर ग्रामस्वराज्याचे प्रणेते, निष्काम कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांच्या कर्मभूमीतच म्हणजे अड्याळ टेकडीवरच या कार्याचा केंद्रबिंदू ठेवू या. कारण ही अशी भूमी आहे की जेथून ग्रामस्वराज्याचे प्रयोग झाले आणि पुढे होणारही आहेत. या ग्रामसंसदेत अनेक विषयांवर चर्चा व मार्गदर्शन झाले. अनेकांनी यावेळी अनुभव कथन केले. या ग्रामसंसदेस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी यावेळी श्री गुरूदेव सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व व सेवा मंडळाचे तत्त्वज्ञान समजून घेतले.
या ग्रामसंसदेचे संचालन प्रा.मिलिंद सुपले यांनी केले तर आभार राजेंद्र घुमनर यांनी मानले.
या ग्रामसंसदेला पंढरपूरचे सेवकराम मिलमिले, रवी मानव, ज्ञानेश्वर रक्षक, सुबोध दादा, चंदू मारकवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .
अड्याळ येथे ग्रामसभा
या ग्रामसंसदेचे औचित्य साधून अड्याळ येथे ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेस अड्याळवासीयांची प्रचंड उपस्थिती होती. यावेळी ग्रामसभा मजबुत करण्यासाठी व प्रचार करण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करण्याचा संकल्प करण्यात आला.