पाणीपुरवठा योजना १२ वर्षानंतरही तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:43 PM2019-03-25T21:43:31+5:302019-03-25T21:43:50+5:30
२००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव : २००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.
पळसगाव हे बल्लारपूर येथून १५ कि.मी. अंतरावर आहे. तेरा वर्षापूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून नळ योजनेची टाकी बांधली. मात्र नळ वितरण प्रणालीला अल्पावधितच ग्रहण लागल्याने संबंधित काम पूर्णत्वास गेले नाही. प्रारंभी नळ योजनेचे काम धडाक्यात सुरू झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. घरापर्यंत पाणी पोहचेल, असेही अनेकांना वाटले, पण त्यांचा आनंद काही दिवसातच मावळला. पाणी घरापर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे अद्याप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. जलस्वराज्य प्रकल्पाचे काम अर्ध्यावरच थांबल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. पूर्वी पळसगावात नळाद्वारे पाणी वितरण केल्या जात होते. परंतु टाकी जीर्नवस्था झाल्याने ती बंद करण्यात आली. त्यानंतर पळसगावात टप्याटप्याने सरकारी दहा बोअरवेल मारण्यात आल्या. परंतु त्या एकाही बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नाही. केवळ एकमेव बोरिंगचे पाणी हे पिण्यायोग्य आहे. त्यामुळे त्या एकाच बोरींगवर महिलांची गर्दी असते. अनेकवेळा महिलांमध्ये भांडण सुद्धा होत आहे. कधी या बोरिंगला बिघाड आला, तर पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.
पाण्यासाठी भटकंती
गावातील जुनी पाण्याची टाकी पाळून नव्याने बांधण्यात आली. मात्र योजना मागील १३ वर्षांपासून पुर्णत्वास गेली नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावाही केला आहे. मात्र काहीही उपयोग झाला नाही. आता गावात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे बोअरवेल लावण्यात आल्या. मात्र पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.