२८ वर्षांनंतरही विद्यार्थिनी भत्ता केवळ एक रुपया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:00 AM2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:25+5:30

जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या शाळेत शिकणारी गरिबांची मुले आहेत. मुलींना शिक्षण मिळावे हा उद्देश महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ठेवला आहे. परंतु २८ वर्षांत एकाही शिक्षक संघटनेने गरीब कुटुंबातील मुलींच्या उपस्थिती भत्त्याबाबत आवाज उठवला नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल. त्यांनीही याकडे आजवर विशेष लक्ष दिले नाही.

After 28 years, the student's allowance is only one rupee | २८ वर्षांनंतरही विद्यार्थिनी भत्ता केवळ एक रुपया

२८ वर्षांनंतरही विद्यार्थिनी भत्ता केवळ एक रुपया

googlenewsNext
ठळक मुद्देसावित्रीच्या लेकींची बोळवण : योजना चांगली; मात्र सुधारणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्याकडे राज्य सरकार व शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. २८ वर्षांपासून त्यांना केवळ एक रुपयाच उपस्थिती भत्ता मिळत असून यात एका नव्या पैशाचीसुद्धा वाढ करण्यात आली नाही. ही सावित्रीच्या लेकींची थट्टा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती सर्वत्र साजरी झाली. मात्र सावित्रीच्या लेकींची अद्यापही बोळवणच केली जात आहे.
शासनाने ३ जानेवारी १९९२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. या निर्णयानुसार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून पहिली ते चौथीमधील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदांमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतील आदिवासी उपयोजना क्षेत्राव्यतिरिक्त राज्याच्या अन्य भागातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आणि विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता देण्यात येतो. पूर्वी ग्रामीण भागात मुलींच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण फार कमी होते. त्यातच पालकांचाही मुलींना शिकविण्याकडे कल कमी होता.
या सर्व बाबींचा विचार करून शासनाने मुलींची शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी उपस्थिती भत्ता योजना सुरू करण्यात आली. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थितीची अट लागू करण्यात आली. शैक्षणिक वर्षासाठी दर दिवसाला एक रुपयाप्रमाणे २२० रुपये उपस्थिती भत्ता दिला जातो. हा शासन निर्णय होऊन जवळपास २८ वर्षे होऊन गेली. सगळीकडे महागाई वाढली. त्यामुळे अनेक योजनेतील लाभार्थी अनुदान वाढले. मात्र गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ झालेली नाही. राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे.

शिक्षक संघटनांचेही दुर्लक्ष
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या शाळेत शिकणारी गरिबांची मुले आहेत. मुलींना शिक्षण मिळावे हा उद्देश महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ठेवला आहे. परंतु २८ वर्षांत एकाही शिक्षक संघटनेने गरीब कुटुंबातील मुलींच्या उपस्थिती भत्त्याबाबत आवाज उठवला नाही, हे आश्चर्य म्हणावे लागेल. त्यांनीही याकडे आजवर विशेष लक्ष दिले नाही.

ग्रामीण भागातील मुली शाळेत याव्यात. त्या शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहाव्या, याकरिता शासन मुलींना उपस्थिती भत्ता म्हणून मागील अनेक वर्षांपासून एक रुपया प्रतिदिन देत आहे. हा भत्ता तुलनात्मक विचार करता नगण्य आहे. पुरोगामी महाराष्ट्रात सावित्रीमाईच्या राज्यात ही सावित्रीच्या लेकींची हेळसांड आहे. शिक्षक भारतीने वेळोवेळी उपस्थिती भत्ता वाढविण्याची मागणी केली आहे. पुढील महिण्यात होणाऱ्या शिक्षक भारतीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा भत्ता वाढवून १० रुपये करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात येणार आहे.
-सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा.

Web Title: After 28 years, the student's allowance is only one rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.