तब्बल ३४ वर्षांनंतर भद्रावतीला मिळाला गावचा आमदार
By admin | Published: October 25, 2014 01:14 AM2014-10-25T01:14:35+5:302014-10-25T01:14:35+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्राला राजकीयदृष्ट्या विशेष महत्व आहे. मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, वन महामंडळाचे अध्यक्ष याच क्षेत्रातून झाले.
माजरी : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्राला राजकीयदृष्ट्या विशेष महत्व आहे. मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, वन महामंडळाचे अध्यक्ष याच क्षेत्रातून झाले. मात्र भद्रावतीकरांना कधी संधी मिळाली नाही. यावेळी प्रथमच भद्रावतीला गावचा आमदार मिळाला आहे.
वरोरा व भद्रावती या दोन तालुक्यांचा परिसर मिळून वरोरा विधानसभा क्षेत्र बनविला आहे. हे क्षेत्र पूर्वी भद्रावती विधानसभा क्षेत्र होते. वरोरा शहरापेक्षा भद्रावती शहराची लोकसंख्या अधिक आहे. भद्रावती शहरात धार्मिक व ऐतिहासिक, पौराणिक प्रसिद्ध स्थळ आहेत. कोळसा खाणी, आयुध निर्माणी व इतर लहान-सहान उद्योग आहेत. ही सर्व जमेची बाजू असताना या विधानसभेचे नाव बदलवून वरोरा विधानसभा क्षेत्र करण्यात आले.
सन १९७८ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर भद्रावतीचे रहिवासी निळकंठ शिंदे यांनी भद्रावती विधानसभेची जागा जिंकली होती. यानंतर भद्रावतीकरांना शहरातला आमदार मिळाला नव्हता. दोनदा अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, त्यानंतर सतत चार वेळा संजय देवतळे यांना संधी मिळाली. मात्र यावेळी नवनिर्वाचित आमदार बाळु धानोरकर हे भद्रावतीचे रहिवासी आहेत.
भद्रावती शहरातला रहिवासी आमदार मिळण्यासाठी भद्रावतीकरांना तब्बल ३४ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. अखेर आ. धानोरकर यांच्या रूपाने संधी प्राप्त झाली आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्र नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र या बालेकिल्ल्याला आता भगदाड पडले आहे. या निर्वाचन क्षेत्रात शेती सिंचन व्यवस्था, नियमित विद्युत पुरवठा, वाढती बेरोजगारी, ग्रामीण क्षेत्रात बसफेऱ्या, माजरीला ३३ केव्ही वीज उपकेंद्र, मोठ्या अ दर्जाच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, माजरीला तालुक्याचा दर्जा, प्रत्येक गावात क्रीडांगण, विद्युत, वीज, पाणी आदी महत्वाच्या प्रमुख समस्या आहेत. (वार्ताहर)