५० वर्षांनंतर टेमुर्डा परिसरात वाघाचे वास्तव्य
By admin | Published: December 30, 2014 11:31 PM2014-12-30T23:31:49+5:302014-12-30T23:31:49+5:30
टेमुर्डा वनपरिक्षेत्रात अनेक गावालगत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वाघ वगळता इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ५० वर्षानंतर या जंगलात वाघाचे वास्तव्य आढळून
वरोरा : टेमुर्डा वनपरिक्षेत्रात अनेक गावालगत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वाघ वगळता इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ५० वर्षानंतर या जंगलात वाघाचे वास्तव्य आढळून आल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने आपले कर्मचारी तैनात केले आहे.
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा उपवनातील बोरगाव, वडधा (सो) मांगली, मांडव, घोराड, रामपूर आदी गावालगत एक हजार पन्नास किमीचा परिसर असलेले जंगल आहे. या जंगलामध्ये नैसर्गिक तलावासोबतच वन विभागाने सिमेंट बंधारे बांधून वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही वर्षांपासून रोपाची लागवड जंगलात केल्याने आता ते वृक्ष मोठे झाले आहे. सदर जंगल घनदाट झाले आहे. जंगल गावालगत असल्याने व शेती लागून असल्याने ग्रामस्थांनी आजपर्यंत जंगलात असणारे सर्वच वन्यप्राणी बघितले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांनी काढलेल्या आवाजावरुन ग्रामस्थ वन्यप्राणी ओळखतात. परंतु आजपर्यंत या जंगलात पट्टेदार वाघाची डरकाळी कधीच ऐकली नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहे.
नागपूर- चंद्रपूर रस्ता ओलांडताना अनेक वाहन चालकांना वाघाने दर्शन दिले. यासोबतच ट्रॅप कॅमेरात वाघाचे फोटो, आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. या परिसरात वाघ असल्याची नोंद ५० वर्षापासून वनविभागाकडे नाही. त्यामुळे वाघाच्या वास्तव्याने वनविभाग चांगलाच सर्तक झाला आहे. जंगलामध्ये पाण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. जंगलात वाघाला शिकारीसाठी वन्यप्राणी सहज उपलब्ध होत असल्याने वाघ या परिसरात कायम स्वरूपी वास्तव्यास राहणार असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)