अखेर ‘त्या’ रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:11 AM2017-12-20T00:11:56+5:302017-12-20T00:12:15+5:30
येथील शिवाजी चौक ते सावरकर चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक अडचणीत, असे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून यापुढे अतिक्रमण केल्यास कडक कार्यवाहीचा इशारा दिला.
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : येथील शिवाजी चौक ते सावरकर चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक अडचणीत, असे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून यापुढे अतिक्रमण केल्यास कडक कार्यवाहीचा इशारा दिला. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
ब्रह्मपुरी शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता म्हणून शिवाजी चौक ते सावरकर चौकाला ओळखले जाते. या रस्त्यावर अनेक वर्षापासून अनेकांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत होता. अनेकांनी पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. या समस्येची दखल घेत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे नगरपालिका व पोलीस प्रशासन जागे झाले. दोन्ही विभागाने कार्यवाही करून संपूर्ण अतिक्रमण हटविले. केवळ अतिक्रमणच हटविले नाही तर अतिक्रमणधारकांना मोठा दंडही भरावा लागेल, अशा सूचनाही केल्या. त्यामुळे सध्यातरी अतिक्रमणधारक धास्तावले आहेत. पुढे अतिक्रमण पुन्हा जैसे थे होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सर्तक राहण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. तात्पुरते का होईना, एकदाचे अतिक्रमण हटले व हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. ही कारवाई न.प. मुख्याध्याधिकारी मंगेश खवले, अभियंता बंडावार, आरोग्य निरीक्षक रामदास ठोंबरे, नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण व त्यांच्या कर्मचाºयांनी केली. या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असले तरी या रस्त्यावर कधीच अतिक्रमण होवू नये, यासाठी पालिकेने दक्ष राहण्याची मागणी नागरिकांकडून केली आहे.