अखेर ती आरोग्यसेविका निलंबित
By Admin | Published: December 11, 2015 01:26 AM2015-12-11T01:26:57+5:302015-12-11T01:26:57+5:30
सुब्बई येथील अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य औषध पाजण्यात आली. यामुळे बालके आजारी पडली.
मुदतबाह्य औषधी प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई
सुब्बई : सुब्बई येथील अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य औषध पाजण्यात आली. यामुळे बालके आजारी पडली. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जबाबदार असलेल्या आरोग्यसेविकेला तात्काळ निलंबित केले.
विशेष म्हणजे, बालकांची तपासणी करण्यासाठी येण्यास नकार देणाऱ्या चिंचोली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजुरा तालुक्यातील सुब्बई या गावात एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी चालविली जाते. अनेक चिमुकले या ठिकाणी शिकत आहे. दरम्यान, अंगणवाडीमधील बालकांना जंताची औषधी पाजण्यात आली. मात्र ही औषधी मुदतबाह्य होती. त्यामुळे त्या औषधीचा अनेक बालकांवर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी बालकांना ताप, हगवण व उलट्या सुरू झाल्या. यामुळे पालक चांगलेच घाबरले. बालकांची प्रकृती आणखी बिघडत असल्याने सुब्बई येथून पाच किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) येथील डॉक्टरांना भ्रमणध्वनी करून बालकांवर उपचार करण्यास सुब्बई येथे येण्याची विनंती करण्यात आली. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती धुडकावून देत सुब्बई येथे येण्यास चक्क नकार दिला. अखेर पालकांनी स्वत:च आपल्या पाल्यांना राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या गंभीर प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर मुलांना मुदतबाह्य औषधी पाजणाऱ्या आरोग्यसेविका पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. यासोबत चिंचोली येथील वैद्यकीय अधिकारी हेमंत फुलझेले यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)