आश्वासनानंतर उपोषण घेतले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:43 PM2018-10-05T22:43:37+5:302018-10-05T22:43:55+5:30
तालुक्यातील गडचांदूर येथे गडचांदूरचा विकास हेच आमचे ध्येय या संघटनेचे अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी गांधी जयंतीपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले होते. प्रशासनाच्या समाधानकारक उत्तरामुळे शुक्रवारी महालिंग कंठाळे यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील गडचांदूर येथे गडचांदूरचा विकास हेच आमचे ध्येय या संघटनेचे अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी गांधी जयंतीपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले होते. प्रशासनाच्या समाधानकारक उत्तरामुळे शुक्रवारी महालिंग कंठाळे यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.
गांधी चौकात सुरू असलेल्या या अन्नत्याग सत्याग्रहाच्या माध्यमातून गडचांदूर तालुक्याची मागणी पूर्ण करणे, गडचांदूर बसस्थानकाची निर्मिती करणे, शुद्ध पेयजल योजना राबविणे, गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे, माणिकगड सिमेंट कंपनीने गडचांदूरला दत्तक घेणे, स्थानिकांना रोजगार देणे, कंपनीने काढलेल्या कामगारांना कामावर घेणे, ऐतिहासिक बुद्धभूमी व लंगडा मारुती मंदिर नाल्यावर पूल बांधणे, क्रीडा संकूल व व्यायामशाळेची निर्मिती करणे, ओपन स्पेस व चौकांचे सादरीकरण करणे, अतिक्रमणधारकांना नियमित पट्टे देणे, सांस्कृतिक भवन व सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करणे, गडचांदूर येथे उपविभागीय पोलीस कार्यालय देणे, पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिका देणे, बंगाली कॅम्पचे पूनर्वसन करणे, अपंग व्यक्तींना पाच टक्के निधी व घरकुल योजनेचा लाभ देणे, रेल्वेस्थानक, शीत शवपेटी, घनकचरा प्रकल्प, अग्निशामक दल अशा विविध २२ मागण्या महालिंग कंठाळे महाराज यांनी प्रशासनासमोर ठेवल्या होत्या. तहसीलदार हरीश गाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, ठाणेदार सुनीलसिंग पवार, नगर परिषदेचे गटनेते पापय्या पोन्नमवार, विठ्ठल थिपे, बंडू धोटे, हंसराज चौधरी, रऊफ खान, वजीर खान पठाण, डॉ. प्रवीण लोनगाडगे, संघटनेचे मुख्य संघटक बंडू वैरागडे, संघर्ष समितीचे मुख्य संघटक उद्धव पुरी, विक्रम येरणे इत्यादींच्या उपस्थितीत महालिंग कंठाळे यांना शरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले. अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले असून २६ जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, असे महालिंग कंठाळे यांनी सांगितले.