न्यायालयाच्या निर्देशानंतर एक कोटींची दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:29 PM2018-07-16T23:29:05+5:302018-07-16T23:29:45+5:30
दारू विक्री प्रकरणातील जप्त केलेली दारू नष्ट करण्याचे निर्देश चंद्रपूर येथील न्यायालयाने दिल्यानंतर सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची दारू नष्ट करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दारू विक्री प्रकरणातील जप्त केलेली दारू नष्ट करण्याचे निर्देश चंद्रपूर येथील न्यायालयाने दिल्यानंतर सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची दारू नष्ट करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी घोषित करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दारूबंदीबाबत गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी विशेष मोहीम राबवून सतत पाठपुरावा करून चंद्रपूर येथील न्यायालयाकडून दारूच्या गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त केलेले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि दारूबंदी विभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली. त्यामध्ये १२ जुलै २०१८ रोजी पोलीस स्टेशन मूल येथील दारूबंदीचे ५७८ गुन्ह्यातील एकूण एक करोड ६६ लाख २८ हजार ८३१ रूपयांची दारू रोडरोलरने नष्ट करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेसराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक चव्हाण आणि संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी केली.