प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:32 AM2019-05-24T01:32:23+5:302019-05-24T01:33:06+5:30
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज गुरुवारी सकाळी ८ वाजता एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या परिसरात सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी सहाही विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज गुरुवारी सकाळी ८ वाजता एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या परिसरात सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी सहाही विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसजसा प्रत्येक फेरीचा निकाल घोषित करण्यात येत होता, तसा परिसरातील कार्यकर्ते व नागरिकांचा जल्लोषही वाढत होता.
पहिल्या फेरीनंतर...
निकाल ऐकण्यासाठी भाजप, शिवसेना, रिपाई (आठवले), काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतमोजणी केंद्र परिसरात दाखल झाले होते. सहाही विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वजण निकाल ऐकण्यासाठी उत्सुक होते. निवडणून निर्णय अधिकाऱ्यांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर केला. भाजपचे हंसराज अहीर हे १५२ मतांनी आघाडीवर असल्याचे घोषित होताच भाजप, शिवसेना व समर्थकांमध्ये जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. हंसराज अहीर यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या.
दुसºया फेरीनंतर...
सकाळी १०.३० वाजतानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसºया फेरीचा निकाल घोषित केला. या फेरीनंतर भाजपचे हंसराज अहीर यांना ४२,१२३ मते तर काँग्रेसचे बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना ४२, १५३ मते मिळाली होती. म्हणजे दुसºया फेरीत काँग्रेसचे धानोरकर यांनी ३० मतांनी आघाडी घेताच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकदम उत्साह संचारला. धानोरकर निवडून येतील, असा विश्वास वाटू लागल्याने त्यांनीही जल्लोष करणे सुरू केले.
तिसºया फेरीनंतर...
तिसºया फेरीनंतर तर काँग्रेस कार्यकर्ते अक्षरश: नाचायला लागले. तिसºया फेरीच्या निकालात काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी तब्बल १७१९ मतांनी आघाडी घेतली होती. तिसºया फेरीनंतर भाजपचे हंसराज अहीर यांना ६१४०६ तर काँग्रेसचे बाळू धानोरकर ६३१२५ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अॅड. राजेंद्र महाडोळे यांना ११८१६ मते मिळाली. काँग्रेसचे धानोरकर सतत दुसºया आणि तिसºया फेरीत समोर असल्याचे माहित होताच चंद्रपूर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही जल्लोष साजरा केला.
दहाव्या फेरीनंतर...
दहाव्या फेरीनंतर भाजपच्या गोटात चिंतेची लाट पसरली होती. कार्यकर्त्यांमध्ये व भाजप समर्थकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरू लागले. मतमोजणी केंद्राच्या परिसरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी कमी होऊ लागली. शहरातील चौकाचौकात सोशल मीडिया व टिव्हीवर निकालाची अपडेट घेणाºया काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तर विजयाचाच जल्लोष दिसून येत होता. दहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना २५८२७० मते तर भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांना २३३७३८ मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसचे धानोरकर हे सलग दहाव्या फेरीनंतरही आघाडीवर चालले होते. दहाव्या फेरीत तर त्यांनी २४ हजार ५३२ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसून आले.
२५ व्या फेरीनंतर...
२५ व्या फेरीनंतर काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.