पाच तपानंतर बदलतेय राष्ट्रसंतांची ‘तपोभूमी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:32 PM2017-12-29T23:32:39+5:302017-12-29T23:32:56+5:30
‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते.
राजकुमार चुनारकर ।
आॅनलाईन लोकमत
चिमूर : ‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना...’ अशा क्रांतिकारी भजनाने जनमाणसात देशप्रेम जागृत करीत मानवतेचा संदेश साºया देशात पोहचविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्याला ओळखले जाते. चिमूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदेडा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. त्यामुळे गोंदेडा या भूमीला संपूर्ण देशात ‘तपोभूमी’ म्हणून ओळखले जाते. तपोभूमीला विकासासाठी ‘पाच तपाची’ प्रतीक्षा करावी लागली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली विकासकामे काही प्रमाणात पूर्ण होत असल्याने तपोभूमीचे रुप पालटत आहे.
अमरावती जिल्ह्यातील ‘यावली’ येथे राष्ट्रसंतांचा जन्म झाला असला तरी त्यांची कर्मभूमी चिमूर तालुका आहे. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेमुळेच चिमुरात १६ आॅगस्ट १९४२ ला इंग्रजाविरूद्ध क्रांती झाली. चिमूर तालुक्यातील गोंदेडा गुंफा येथे राष्ट्रसंतांनी ध्यान साधना केली. यामुळे या भूमीला तपोभूमी म्हणून पुर्ण राज्यात नावलौकिक प्राप्त झाले आहे. या भूमीत प्रत्येक वर्षी पाच दिवस यात्रा भरते. या निमित्ताने हजारो गुरुदेवभक्त या ठिकाणी पावन भूमीच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होतात.
राष्ट्रसंतांच्या तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून तालुक्यातील राजकीय पुढारी व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. तपोभूमीच्या विकासाकरिता वन जमिनीचा मोठा अडसर होता. त्यामुळे ही भूमी विकासापासून दूर राहत गेली. मात्र क्षेत्रातील तत्कालिन आमदारांनीही या भूमीच्या विकासाकरिता हातभार लावून योगदान देण्याचा प्रयत्न चालविला.
तपोभूमीचा विकास व्हावा म्हणून प्रथमच आमदार कीर्तीकुमार भांगडिया व विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी सरकारकडे साकडे घातले. तपोभूमीला पर्यटन क्षेत्र घोषित करून विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात तपोभूमीच्या विकासासाठी ३४ कोटी रुपयांची तरतूद केली. या निधीतून तपोभूमीत आजघडीला मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. तपोभूमीच्या विकासाकरिता ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी १५ कोटींची विकासकामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सभागृह, ध्यान केंद्र, अंतर्गत रस्ते, भवन निवास, विद्युत यासह इतर कामे केली जात आहेत. सभागृह व ध्यान केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. तर २० एकर जागेमध्ये स्व.उत्तमराव पाटील वनउद्यानाचे कामही प्रगतिपथावर आहे.