कोविड टेस्ट वाढविल्यानंतर पॉझिटिव्हिटी दरात होऊ लागली घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:29 AM2021-05-07T04:29:58+5:302021-05-07T04:29:58+5:30
कोरोना संसर्गाची भयावहता जाणवण्यापूर्वी बरेच नागरिक आजार अंगावरच काढत होते. परंतु, फेब्रुवारी २०२१ च्या अखेरच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू ...
कोरोना संसर्गाची भयावहता जाणवण्यापूर्वी बरेच नागरिक आजार अंगावरच काढत होते. परंतु, फेब्रुवारी २०२१ च्या अखेरच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू लागली. तरीही नागरिक स्वत:हून कोविड चाचणी करण्यास केंद्रात जात नव्हते. याच कालावधीत कुटुंबातील एकाला कोविड बाधा झाली की संपूर्ण कुटुंब आजाराच्या कचाट्यात सापडू लागले. आजार वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्याने अनेकांच्या प्रकृतीत गुंतागुंती निर्माण झाल्या. सहव्याधी असणाऱ्यांनी वेळीच रुग्णालयात न गेल्याने उपचारादरम्यान मृत्यू वाढू लागले. मार्चपासून जिल्हा आरोग्य यंत्रणेने आरटीपीआर व अँटिजेन चाचण्यांचा धडाका सुरू केला. चंद्रपूर मनपा क्षेत्र व जिल्ह्यातील ग्रामीण भागात तपासणी केंद्रांची निर्मिती केली. त्यामुळे कोरोनाबाधितांना डिटेक्ट करून गंभीर रुग्णांवर लगेच उपचार, सौम्य तसेच लक्षणे नसणाऱ्यांना गृहविलगीकरणाच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात याचा चांगला परिणामही दिसून आला. १ एप्रिलपासून बाधित आढळत असले तरी ही संख्या दोन हजारच्या वर जाऊ शकली नाही. सुरुवातीला दोन हजारपासून सुरू झालेल्या चाचण्यांची संख्या ५ मेपर्यंत ५ हजारच्या पुढे गेली. पण, पॉझिटिव्हिटीची संख्या दीड हजारच्या आसपास राहिली. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकाेर पालन केल्यास कोरोनावर मात करण्यास विलंब लागणार नाही, असेच सध्याचे तरी चित्र आहे.
मृत्यू रोखणे हेच खरे आव्हान
कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून रुग्ण व संशयितांना लगेच डिटेक्ट करण्याचे आरोग्य यंत्रणेचे पाऊल संसर्ग रोखण्यास उपयुक्त ठरू लागले. चाचणी केल्यानंतर २४ तासांत अहवाल आल्यास पॉझिटिव्हिटी दर पुन्हा कमी होऊ शकतो. मात्र, मृत्युदर रोखण्यास प्रशासनाला अजूनही यश आले नाही. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्सची संख्या वाढविण्यासाठी प्रशासन गतीने कामाला लागले. बेड्सची संख्याही आता वाढू लागली. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरही उपलब्ध होत आहेत. नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू झाले. कोविड पेशंट मॅनेजमेंट पाेर्टलमुळे खासगी हॉस्पिटल्सच्या मनमानीला काही प्रमाणात चाप बसला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार व पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे कोविड प्रतिबंधासाठी झटत आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी बऱ्याच आरोग्य सुविधा निर्माण होऊ शकल्या. प्रशासनाच्या या जमेच्याच बाजू आहेत. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव जाऊ नये, याकडेच आता अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.
तिसऱ्या लाटेविरुद्ध हवी तयारी
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या उभारण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधा रुग्णांना संजीवनीच देणाऱ्या आहेत. मात्र, बऱ्याच सुविधा अद्याप कार्यान्वित झाल्या नाहीत. पॉझिटिव्हचे प्रमाण घसरणीला लागले, परंतु मृतांची संख्या दररोज २० ते २५ च्या पुढे जात आहे. कोरोना विषाणूने स्वत:मध्ये बदल केल्याने संसर्गाचा धोका संपला नाही. केंद्र व राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे ही लाट परतवून लावण्यासाठी सध्या सुरू असलेले आरोग्य प्रकल्प न गुंडाळता यंत्रणा सक्षम करून ठेवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.