३० नोव्हेंबरच्या खाण अपघातानंतर चंद्रपुरातील १६ लाख टन कोळसा मातीच्या ढिगाऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:24 AM2017-12-16T11:24:32+5:302017-12-16T11:26:40+5:30
माजरी वेकोलि क्षेत्रातील जुना कुनाडा कोळसा खाणीत ३० नोव्हेंबरला रात्री दीड वाजता मातीचा ढिगारा कोसळल्याची घटना घडली होती. या खाणीतील मातीच्या ढिगाऱ्यात सुमारे १६ लाख टन कोळसा दबून असल्याची माहिती पुढे आली आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : माजरी वेकोलि क्षेत्रातील जुना कुनाडा कोळसा खाणीत ३० नोव्हेंबरला रात्री दीड वाजता मातीचा ढिगारा कोसळल्याची घटना घडली होती. या खाणीतील मातीच्या ढिगाऱ्यात सुमारे १६ लाख टन कोळसा दबून असल्याची माहिती पुढे आली आहे.
जुना कोनाडा खाणीतून कोळसा उत्खनन करण्याचे कंत्राट धनसार इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनीकडे आहे. उत्खननाचे काम सुरू असताना महाकाय मातीचा ढिगारा कोसळल्याने सहा कामगार गंभीर जखमी झाले होते. या खाणीत वॉल्वो टिप्पर, डोजर, पी. सी. मशिन, ड्रिल मशिन, सर्व्हिस वाहन व इतर मशिन अजुनही दबून आहेत. याप्रकरणी कोल इंडियाने कुणावरही कार्यवाही केली नाही. त्यामुळे वेकोलि सुरक्षा समितीचे संचालक व कोल इंडिया अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सुरक्षा समितीचे संचालक मंडळ, वेकोलि अधिकाऱ्याच्या विशेष पथकाने खाणीची वारंवार पाहणी केली. मात्र, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या मशिन बाहेर कशा काढायच्या, हा प्रश्न पुढे आल्याने वेकोलिच्या वरिष्ठांनी खाण बंद ठेवण्याचे आदेश दिले. यासंदर्भात ‘लोकमत’ ला माहिती देताना माजरी वेकोलिचे महाप्रबंधक एम. येलय्या म्हणाले, लवकरच जुना कुनाडा कोळसा खाण सुरू होईल. डि.जी.एम.एस. यांची परवानगी मिळताच धनसार इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनीच्या वतीने मागच्या दिशेने नवीन बेंचेस तयार करण्याचे नियोजन करण्यात येईल. ढिगाऱ्याखाली दबलेल्या मशिन काढण्यासाठी तीन ते चार महिने लागतील. सुरक्षतेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कोळसा उत्पादन सुरू करू, असेही येलय्या यांनी सांगितले.
नुकसान भरपाई देण्याची वेकोलिवर पाळी
खाणीतून दररोज पाच हजार टन कोळसा व ३२ हजार टन माती काढण्याचे काम सुरू होते. वेकोलिने धनसार कंपनीला तीन वर्षांचे कंत्राट दिले असून, ३२ लाख टन कोळसा उत्पादन खाणीतून करायचे आहे. करारानुसार धनसार कंपनीचे १८ महिन्यांचे काम शिल्लक आहे. कंपनीने उर्वरीत कोळसा काढण्यास नकार दिल्यास नुकसान भरपाई देण्याची पाळी वेकोलिवर येणार असल्याचे बोलले जात आहे.