ठाणेदारांच्या आदेशानंतरही पोलीस चौकी बंद
By admin | Published: July 19, 2014 11:50 PM2014-07-19T23:50:48+5:302014-07-19T23:50:48+5:30
शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील काही भागांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र यातील काही चौकी नेहमी कुलूप बंद रहात असल्याने नागरिकांना मोठा त्रास
चंद्रपूर : शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील काही भागांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र यातील काही चौकी नेहमी कुलूप बंद रहात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पोलीस चौकीच्या परिसरात गुऱ्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील पोलीस चौकी पूर्णवेळ सुरु ठेवून येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
येथील बाबूपेठ परिसरातील नागरिकांच्या तक्रारी तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस चौकी निर्माण करण्यात आली. ही चौकी पूर्वी व्यवस्थित सुरु होती. मात्र मध्यंतरी या चौकीला कुलूप लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस चौकी पूर्ववत सुरु झाली. मात्र काही दिवसातच चौकीमध्ये अनियमितपणा आला. महिनाभरात अर्धेअधिक दिवस ही चौकी बंद रहाते. त्यामुळे येथील काही नागरिकांनी ठाणेदाराकडे याबाबत तक्रार दाखल केली. ठाणेदारांनी तत्काळ दखल घेत ही पोलीस चौकी सुरु ठेवण्याचे आदेश दिले. मात्र ठाणेदाराच्या आदेशाली पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. पोलीस चौकी पूर्णवेळ सुरु रहात नाही. त्यामुळे अनेकवेळा तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलिसांची वाट बघत ताटकळत बसावे लागते. चौकी बंद रहात असल्याने अवैध धंदे, छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील पोलीस चौकी नियमित सुरु ठेवून नागरिकांना दिल्यासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १९ जूलै रोजी सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध कामांसाठी सकाळी ११ वाजता बोलाविले. पोलिसांच्या आदेशानुसार नागरिक सकाळी ११ वाजता पोलीस चौकीत पोहोचले. मात्र येथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला. ठाणेदारांनी याकडे लक्ष देवून पूर्णवेळ पोलीस चौकी सुरु राहील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(नगर प्रतिनिधी)