सात तासांची अथक मेहनत आणि दोन तास रस्ता बंद करून अखेर नरभक्षक वाघ जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 10:23 PM2021-12-23T22:23:23+5:302021-12-23T22:23:54+5:30
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही काळापासून विविध ठिकाणाच्या तीन नागरिकांना ठार केलेल्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी तीन जणांना वाघाने ठार केले. रोजच वाघाचे कुठे ना कुठे दर्शन होत आहे. यामुळे पोंभुर्णा परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच गुरुवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास वाघाने एका बकरीची शिकार केली. याची माहिती गावकऱ्यांना होताच त्या वाघाला पळवून लावण्यासाठी गावकरी एकवटले आणि वाघाला पळवून लावले. मात्र, वाघ एका पुलाखाली शिरला. पुलाचा पुढील भाग बंद असल्याने तो तिथेच अडकला. ही संधी साधत वनविभागाने या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे वाघाच्या दहशतील असलेल्या पाेंभुर्णा तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
वाघाबाबतची माहिती पोंभुर्णा वनविभागाला मिळताच त्यांचा चमू घटनास्थळी दाखल झाला आणि पाईपमधील जाणारा रस्ता बंद करण्यात आला. वाघ पुलामध्ये असल्याची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणि वाघाला बघण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली. वाघाची सुटका करण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. पण वाघाला जेरबंद करा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. तब्बल सात तासानंतर वाघाला पकडण्यात यश आले.
दोन तास ठेवावा लागला रस्ता बंद
रेस्क्यू टीम वाघाला जेरबंद करत असताना दोन्ही बाजूने रस्ता बंद ठेवण्यात आला होता. यावेळी सर्व वाहने जिथल्या तिथे थांबली होती. तब्बल दोन तास हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता.
तिघांचा बळी, तर पंधरापेक्षा अधिक नागरिक जखमी
यावर्षी मार्चमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. मागच्याच महिन्यात कसरगट्टा येथील कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला कवीटबोळी शिवारात वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच वेळवा येथे फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला. शिवाय पंधरापेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. यामुळे पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अखेर हा वाघ जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.