पत्नीच्या पाठोपाठ पतीनेही घेतली विहिरीत उडी; दोघांचाही बुडून मृत्यू
By परिमल डोहणे | Published: August 25, 2024 12:06 AM2024-08-25T00:06:12+5:302024-08-25T00:06:43+5:30
गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा येथील घटना
चंद्रपूर : घरगुती कारणातून वाद झाल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिला वाचवायला तिच्या मागोमाग पतीनेसुद्धा विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांचाही विहिरीत बुडून करून अंत झाला. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा गावात शनिवारी रात्री 9.30 वाजताचा सुमारास घडली. पती-पत्नीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावातच शोककडा पसरली आहे.
प्रकाश शरबत ठेंगणे (30), उषा प्रकाश ठेंगणे (27) अशी मृत दांपत्याचे नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांतने मागील तीन महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील इल्लूर येथील उषा हिचासोबत आंतरजातीय प्रेमाविवाह केला होता. सुखी संसार सुरु असतानाच शनिवारी रात्री दोघात वाद झाला, रागाच्या भारत उषाने घराशेजारील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी प्रकाशने सुद्धा लगेच विहिरीत उडी घेतली. दरम्यान शेजारच्या मुलाने हे दृश्य बघून इतरांना या संदर्भातील माहिती दिली.
नागरिकांनी गोंडपिपरी पोलिसांना माहिती देताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळ गाठून विहिरीत शोध मोहीम राबवली असता, दोघांचेही मृतदेह आढळून आले. वृत्तलिहीपर्यंत नेमके आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.