घातपाताचा संशय; तीन महिन्यांनंतर ‘त्या’ चिमुकल्याचा पुरलेला मृतदेह चौकशीसाठी काढला बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 02:25 PM2022-10-18T14:25:26+5:302022-10-18T14:30:32+5:30
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात
चंद्रपूर : तीन महिन्यांपूर्वी जमिनीत पुरलेला ७ वर्षीय मुलाचा मृतदेह सोमवारी दुपारी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीसाठी बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. हा मृतदेह कुशल जितेंद्र मशारकर याचा आहे. त्यांच्या मृत्यूबाबत त्याच्या आईने संशय व्यक्त करून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चाैकशीसाठी तक्रार केली होती. या आधारे न्यायालयाच्या आदेशानुसार पुरलेला मृतदेह काढण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली.
प्राप्त माहितीनुसार, कुशलचा ८ जुलै २०२२ रोजी दुपारी अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याला स्थानिक डाॅक्टरांकडे नेण्यात आले होते. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ जुलै रोजी कुशलचा मृतदेह इरई नदीच्या परिसरात जमिनीत पुरला होता. उल्लेखनीय, मुलाच्या आकस्मिक मृत्यूच्या एक महिन्यानंतर १८ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील नायगाव येथील जि. प. शाळेत शिक्षिका असलेल्या वैशाली चन्नवार-मशारकर या घरी परतण्यासाठी वणी बसस्थानकावर असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला चढविला होता. या प्रकरणी चौकशीअंती या हल्ल्यामागे शिरपूर पोलिसांनी वैशालीचे पती जितेंद्र मशारकर याचाच हात असल्याची माहिती होताच त्याला अटक केली. त्याने हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचेही पुढे आले होते.
पोलिसांनी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. जितेंद्र मशारकर आता यवतमाळ जिल्हा कारागृहात आहे. दरम्यानच्या काळात त्याची पत्नी वैशालीने मुलाच्या मृत्यूवरही संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. यानंतर पोलीस अधीक्षकांनी तालुका न्यायदंडाधिकारी यांच्याकडे याबाबत परवानगी मागितली होती. ही परवानगी प्राप्त होताच सोमवारी दुपारी कुशल मशारकर याचा जमिनीत पुरलेला मृतदेह पोलिसांनी चौकशीसाठी बाहेर काढला. उत्तरीय तपासणीअंती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. यानंतर कुशलचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपाताने झाला हे रहस्य उलगडणार आहे.